विमानतळाच्या निविदांमुळे नोंदणीत पंधरवडय़ात १६-१७ टक्के वाढ; जमिनींचे दर वधारले

विमानतळ बांधकामांची निविदा मंजूर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई, पनवेल, उरणमधील मालमत्तांच्या नोंदणीत सुमारे १६ ते १७ टक्के वाढ झाली आहे. केवळ विमानतळ होणार या घोषणेमुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील विकासकांनी घर व जमिनींचे दर वाढविले होते. विमानतळाची निविदा मंजूर झाल्यानंतर ग्राहक व गुंतवणूकदारांनी महामुंबईकडे मोर्चा वळविला आहे. तीन महिन्यांत मालमत्ता नोंदणी कार्यालयात झालेल्या एकूण नोंदणीतील १६ ते १७ टक्के नोंदणी गेल्या १५ दिवसांतील आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. सिडकोने आपल्या अखत्यारीतील ११६० हेक्टरमध्ये १६०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात केली आहे. विमानतळ उभारणीचे काम मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीव्हीके या कंपनीला मिळाले आहे, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अर्थसाहाय्य करणारी वित्त संस्था हे दोन सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत पाया घातलेल्या या प्रकल्पाचा आरंभ भाजप सरकारच्या काळात होत आहे. उभारणीचा आरंभ सोहळा मोठय़ा दणक्यात होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील विमान उड्डाण येत्या तीन ते चार वर्षांत होण्याची शक्यता गृहीत धरून महामुंबई क्षेत्रात गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. या ठिकाणी विमानतळ होणार असल्याची जाहिरातबाजी करून गेल्या २० वर्षांत अनेक विकासकांनी जमिनी व घरांच्या किमती गगनाला पोहोचवून ठेवल्या होत्या, मात्र त्या मालमत्तांना म्हणावा तसा परतावा आला नाही. रियल इस्टेट क्षेत्रात असलेली मंदी आणि निश्चलनीकरणामुळे आधीच हवालदिल झालेल्या विकासकांना पनवेलमधील विमानतळ ही एक संजीवनी ठरणार आहे.

अनेक बक्षिसे व सवलतींचे आमिष दाखवूनही आरक्षण न करणाऱ्या ग्राहकांना विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने आता ही गुंतवणूक सोयीस्कर वाटू लागली आहे. कोपरखैरणे, वाशी, बेलापूर या नवी मुंबईतील भागांत गेल्या तीन महिन्यांत ७ हजार ६०० मालमत्तांची नोंदणी झाली आहे. गेल्या १५ दिवसांत १६ ते १७ टक्के वाढ झाल्याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याने दिली. ही नोंदणी विमानतळाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या निविदाप्रक्रियेमुळे वाढल्याचे बांधकाम क्षेत्रातील दलाल आणि विकासकांचे मत आहे.

विमानतळाचे काम सुरू झाले असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे चौकशी करणाऱ्या ग्राहकांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. त्या ग्राहकांचे मनपरिवर्तन होऊन ते लवकरच घरांचे आरक्षण करतील असे दिसून येते. विमानतळ, मेट्रो, सी लिंक यामुळे पनवेल, उरण क्षेत्राला महत्त्व येणार आहे. विमानतळाच्या पायाभरणी समारंभानंतर ग्राहक मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करतील असा विश्वास आहे.

मनीष भतिजा, विकासक, पनवेल