सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ मार्च २०१७ च्या आदेशानुसार १ एप्रिल २०१७ पासून सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधातील याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील महामार्गावर दारूबंदी लागू होणार नसल्याचा निर्णय दिला होता. यामुळे पनवेल शहरातील बंद झालेले बार पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्यविक्रीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. या निर्णयामुळे २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागातील महामार्गापासून २२० मीटपर्यंत दारू दुकाने नसावीत, अशी बंदी १ एप्रिलपासून लागू करण्यात आली होती. तर २० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात चंदीगढमधील एका याचिकाकर्त्यांने याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर दारूबंदी लागू होणार नसल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये पनवेलमधील परवाना रद्द झालेले १०० हून अधिक मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत.

पनवेलमध्ये एकूण १२३ बार सुरू होते. त्यापैकी ६९ बार सुरू होते. तर आता बंदी उठल्याने ५४ बारला मद्यविक्री करण्याचा परवाना देण्यात येणार आहे.

दारूमुक्त खारघरच्या प्रयत्नांना धक्का

५०० मीटरच्या आतील महानगरपालिका क्षेत्रातील शहरात दारूबंदी नसल्याने दारूमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या खारघरमध्ये पुन्हा दारूविक्री सुरू होणार आहे. अजित पॅलेस व रॉयल टय़ुलिप याठिकाणी बार सुरू होते. मात्र राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मद्यविक्रीस बंदीनंतर हे बार बंद झाले होते, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील बारही पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शहरात महामार्गावर मद्यविक्रीस बंदी नसल्याचा निर्णय जाहीर केल्याने पनवेलमध्ये १०० बार सुरू  होणार आहेत. त्यापैकी २० परवानाधारकांना दोन दिवसांपूर्वीच मद्यविक्री परवाने देण्यात आले आहेत.

एस. एन. पोकळे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग