राज्यात अनेक ठिकाणी बंदी असलेले नदी व खाडी पात्रातील वाळू उपसा नवी मुंबईतील उलवा खाडीत सुरू असल्याची तक्रार काही पर्यावरणवादी संघटनांनी केली आहे. छोटय़ा बोटींनी करण्यात येणाऱ्या या वाळू उपशावर शासकीय यंत्रणांचे लक्ष नसल्याचा आरोप केला जात आहे. उलवा बेलापूर खाडीपूल तसेच खांदेश्वर-खारघर दरम्यान या उत्खननाने खारफुटी व पाणथळांच्या जागांवर परिणाम होत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वाळू उत्खननाला बंदी आहे, मात्र कोकणातील काही नदी व खाडीकिनाऱ्यांवर आजही बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. रायगड जिल्ह्य़ात तर वाळू उत्खननाचा गोरख धंदा गेली अनेक वर्षे बिनबोभाट सुरू असून शासकीय यंत्रणेचा त्याला कृपार्शीवाद असल्याचे मानले जाते. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले तेली यांनी काही महिन्यांपूर्वी या बेकायदेशीर वाळू  उपशावर धडक करवाई सुरू केली होती, पण अलीकडे हे उत्खनन पुन्हा सुरू झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. वाळू उत्खनन करताना खारफुटी व पाणथळ जागांचा नाश केला जात असल्याने पर्यावरणवादी संघटनांनी या बेकायदेशीर वाळू उपशाच्या विरोधात पुन्हा शंख फुंकला आहे. उरण व नवी मुंबईला जोडणाऱ्या उलवा खाडीपुलाजवळ काही बोटी रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन करीत असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबईतील नियोजित विमानतळाच्या कोअर क्षेत्रात येणाऱ्या गणेशपुरी गावाजवळ हे वाळू उत्खनन जोरात सुरू असल्याची तक्रार आहे. हाच प्रकार खांदेश्वर ते खारघर या खाडीकिनाऱ्यांवर दिसून आले आहे, तर खारघर येथील सिडकोच्या वास्तुविहार गृहसंकुलाच्या मागील बाजूस सर्रासपणे वाळू उत्खनन सुरू असून त्याकडे पनवेलची महसूल यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. सुमारे २०० छोटय़ा-मोठय़ा बोटीतून ही वाहतूक केली जात आहे. हे उपसा करताना खारफुटी आणि पाणथळ जागांचा नाश केला जात असून, या क्षेत्रात येणाऱ्या फ्लेमिंगोच्या हक्काच्या जागांवर गंडांतर आणले जात आहे. रायगड जिल्ह्य़ात वाळू उत्खनन बंदी असताना अनेक ठिकाणी ते सुरू असून जिल्ह्य़ातील शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.

खांदेश्वर, खारघर आणि उलवा भागात अशा प्रकारे वाळू उत्खनन होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी खास शोध पथक नेमले जाणार आहे. जनतेने याबाबत तक्रारी केल्यास त्याचे स्वागत करून कारवाई केली जाईल.

– भरत शितोळे, प्रांताधिकारी, पनवेल</strong>