‘लोकसत्ता’ आयोजित ‘आरोग्यमान भव’ कार्यक्रमास तुटुंब गर्दी; तज्ज्ञांचे मार्गदर्शन

निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र कृतीत आणण्यासाठी वाशी येथील ‘लोकसत्ता’ आयोजित ‘आरोग्यमान भव’ कार्यक्रमाला गुरुवारी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण-तरुणींनी मोठी हजेरी लावली होती. बदलत्या कार्यसंस्कृतीत रोगांना दूर ठेवायचे तर आहार, व्यायाम आणि झोप या तिन्हींचा योग्य तोल राखणे अधिक गरजेचे बनले आहे. यासाठी विष्णुदास भावे नाटय़गृहात तीन तज्ज्ञांनी मते मांडली. तज्ज्ञांनी दिलेला सल्ला केवळ ऐकण्यापेक्षा तो लिहून घेण्यात, तसेच स्मार्ट फोनवर ध्वनिमुद्रित करण्यात अनेक जण आघाडीवर होते. या वेळी आरोग्यविषयक ‘स्लाइड शो’ दाखविण्यात आला.

आधुनिक जगात साध्ये मिळविण्याच्या शर्यतीत शरीर आणि मनाची मशागत करण्याचे महत्त्वाचे कार्य राहून जाते. मग आरोग्याच्या समस्या डोके वर काढण्यास सुरुवात करतात. या समस्या जाणून त्यावर वेळीच उपाय करण्याची गरज म्हणून डॉक्टरी सल्ला अविभाज्य भाग बनून जातो. या कार्यक्रमासाठी भावे नाटय़गृहात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. कामांचा दिवस असूनही महिला, तरुण- तरुणींनी सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळविण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

ठीक सकाळी दहा वाजता आरोग्यमान कार्यक्रम सुरू झाला. याआधी नाटय़गृहात मोक्याची जागा पटकावण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांनी नाटय़गृहाच्या आवारात येण्यास  सुरुवात केली. ठाणे, तसेच उपनगरातून मोठय़ा संख्येने नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर डॉ. अश्विन सावंत यांनी आरोग्याचा राजमार्ग सांगितला. यानंतर डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आधुनिक जीवनशैली जगताना रोगांना कसे दूर ठेवावे, याविषयी सल्ला दिला, तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी तणावमुक्त जीवनशैलीविषयी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. या वेळी नाटय़गृहाबाहेर प्रदर्शनाला नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी ‘माधवबाग’च्या स्टॉलवर मधुमेहाची तपासणी करण्यात आली. ‘माधवबाग’ प्रस्तुत ‘लोकसत्ता’ आरोग्यमान भव या कार्यक्रमासाठी असोशिएट पार्टनर जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय पितांबरी प्रॉडक्ट प्राय. लि. हायजिन पार्टनर, कमांडर स्लिमहाइड आणि डेंटल केअर पार्टनर श्री डेंटल स्पेशालिटी हॉस्पिटल हॉलिडेज यांचे सहकार्य लाभले.

आज पुन्हा संधी

गुरुवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या नागरिकांना शुक्रवारी (३० सप्टेंबर) या कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात हा कार्यक्रम होईल.

‘लोकसत्ता’ आयोजितहा कार्यक्रम अतिशय उत्तम ठरला आहे. मानसिक तणाव कसे दूर करावेत याची माहिती यातून मिळाली. याविषयी इतरांपर्यंत काही मौलिक माहिती पोहोचवता येईल.

– वैशाली सबनीस

डॉ. अश्विन सावंत यांच्या व्याख्यानातून पाश्चात्त्य देशांच्या ‘मार्केटिंग’ पद्धतीचा प्रभाव भारतीय समाजावर कसा पडला आहे. त्यातून वस्तूंची विक्री कशी केली जाते आणि यात ग्राहकाची कशी फसवणूक होते, हे सांगण्यात आले.

– रामचंद्र जोशी

ज्येष्ठ नागरिकांनाही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मागदर्शनाची गरज आहे. थेट डॉक्टरी उपचारांऐवजी तज्ज्ञांनी दाखवलेले मार्गदर्शन उपयोगी पडेल. आजार आणि त्याची कारणे समजली. याशिवाय काय उपचार करावेत हेही कळाले.

– रामचंद्र कलबासकर