उद्योजक :  एन. डी. चव्हाण

सिमेन्स, भारत बिजली, हिंद रेक्टीफायरसारख्या बडय़ा कारखान्यांना हवी ती यंत्रे बनवून देणारे रबाळे येथील उद्योजक एन. डी. चव्हाण हे हायड्रॉलिक सीजर लिफ्ट, मटेरियल गुड्स लिफ्टच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यांनी साकीनाका येथे एका छोटय़ा जागेत सुरू केलेल्या विविध प्रकारची यंत्रे बनविण्याच्या उद्योगाने आज स्वतचे खास स्थान निर्माण केले आहे. रबाळे औद्योगिक वसाहतीतील त्यांच्या तीन कारखान्यांनी शेकडो कामगारांच्या हाताला काम मिळवून दिले आहे.

सांगली जिल्ह्य़ातील जत संस्थानचा एक भाग असलेल्या डफळापूर गावाचे एन. डी. चव्हाण यांनी १९६५ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीत पदविका मिळवली आणि भविष्य घडवण्यासाठी ठाणे गाठले. त्यावेळी अभियंता मिळणे तसे दुर्लभच होते. त्यामुळे या तरुणाला ‘बायर इंडिया’ या कंपनीत तात्काळ नोकरी मिळाली. ही एक जर्मन कंपनी असल्याने तिथे चव्हाण यांनी कामाबरोबरच जर्मन भाषेचेही धडे गिरवले. बडय़ा कंपनीतील नोकरी म्हणजे घोडय़ाला झापडं लावावीत तसे काम करा आणि शांत बसा या पठडीतील असल्याचा अनुभव चव्हाण यांना आला. त्यामुळे त्यांनी या प्रतिष्ठित कंपनीतील नोकरी सोडून रेल्वे व्ॉगन बनविणाच्या के. टी. स्टील या छोटय़ा कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली.

या कारखान्यात बऱ्यापैकी प्रशिक्षण झाल्यानंतर चव्हाण यांनी भांडुप येथील बजाज समूहाची उपकंपनी असलेल्या हिंद रेक्टीफायरमध्ये नोकरी केली. या ठिकाणी कच्च्या मालाचे पुरवठादार, वेंडर यांच्याशी मोठय़ा प्रमाणात संपर्क आला. एक उद्योजक म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गुणांची माहिती या काळात त्यांना झाली होती.

त्यानंतर चव्हाण यांनी साकीनाका येथील झोपडपट्टी वसाहतीत भाडेपट्टय़ावर एक छोटी जागा घेऊन उद्योग सुरू केला. १९८० मध्ये प्रथम वातानुकूलन यंत्रणेला लागणारी छोटी यंत्रे बनवली. त्यामुळे पहिल्या कंपनीचे नाव कॅरीअर कुलिंग इंडस्ट्री ठेवण्यात आले. सकाळी ८ ते संध्याकाळी ५पर्यंत ‘हिंद’मध्ये काम करून संध्याकाळी ६ नंतर रात्री ११पर्यंत चव्हाण आपल्या छोटय़ाशा उद्योगाचा भार वाहात होते. दोन ठिकाणी काम केल्याने कळव्याला घरी येण्यास रात्रीचे १२-१ वाजत, पण आयुष्यात उद्योजक होण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाने इतर सर्व गोष्टींना गौण स्थान देत उद्योगाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.

स्वत:च्या उद्योगाचा पसारा वाढू लागल्याचे लक्षात येताच ‘हिंद’ची नोकरी सोडण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला, पण ‘हिंद’च्या व्यवस्थापनाने तीन वेळा चव्हाण यांचा राजीनामा फेटाळून लावला. याच काळात कोयना येथे भूकंप झाल्याने संध्याकाळच्या वेळेस चार तास भारनियमन जाहीर करण्यात आले. त्यामुळे चव्हाण यांना आपल्या कारखान्यात जाऊन केवळ हाताची घडी घालून बसण्याशिवाय काहीही करता येत नव्हते.

याच सुमारास त्यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात वाचली. नव्याने सुरू झालेल्या रबाळे एमआयडीसीमध्ये उद्योजकांसाठी शेड विक्रीला काढण्यात आले होते. चव्हाण थेट एमआयडीसीचे तत्कालीन अतिरिक्त विशेष कार्यकारी अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्याकडे गेले. अशा प्रकारे उच्च अधिकाऱ्याकडे जाण्याची हिमंत कोणाकडेच नव्हती. पाटील यांनीही प्रश्न केला, ‘तू थेट माझ्याकडे कसा आलास?’ त्याला चव्हाण यांनी दिलेले उत्तर समर्पक होते. ‘तुम्ही मला एक तर उद्योगासाठी भूखंड द्याल किंवा नाही देणार पण मारहाण नक्कीच करणार नाही.’ या उत्तरामुळे पाटील यांना या उदयोन्मुख उद्योजकाच्या जिद्दीचा अंदाज आला आणि चव्हाण यांना हवा तो पहिला एमआयडीसी भूखंड रबाळे येथे मिळाला.

भूखंड मिळवण्यासाठी आवश्यक असणारे १८ हजार २०० रुपये देखील चव्हाण यांच्याकडे नव्हते. त्यांनी कसेबसे ते जमा करून भरले खरे पण त्यापुढील ५२ हजारांच्या रकमेचा प्रश्न आ वासून उभा होताच. त्यासाठी पाटील यांनी चव्हाण यांना तब्बल सात वर्षांची मुदत दिली आणि त्यांच्यात दडलेल्या उद्योजकाची वाट सुकर केली.

त्यानंतर चव्हाण यांनी मागे वळून पाहिले नाही. रबाळे येथे स्थिरस्थावर झाल्यानंतर जवळच्या सिमेन्स कंपनीत लागणारी छोटी-मोठी यंत्रसामग्री बनवून देण्याची कामे त्यांना १९८४ च्या सुमारास मिळू लागली. ‘बायर इंडिया’मध्ये शिकलेल्या जर्मन भाषेचा ‘सिमेन्स’मधील कामे मिळवताना उपयोग झाला. बायरचे माजी अभियंता म्हणून ही कामे सहज मिळत गेली. याच काळात रबाळे येथील कारखान्यात व्हॅक्यूम व्होल्व बनवली गेली. कोलकाता येथील एका सहकाऱ्यामुळे ‘हिंद’ची कामेही चव्हाण यांच्या कंपनीला मिळू लागली होती. सिमेन्सच्या स्विच गिअर, स्विच बोर्ड विभागात लागणारे वायरिंग बोर्ड, टिल्टिंग टेबल बनविण्याची कामे सिमेन्सने मोठय़ा विश्वासाने दिली. त्यानंतर चव्हाण यांच्या ईओटी क्रेनला सिमेन्सनेही पसंती दिली. त्यामुळेच सिमेन्समधील नऊ क्रेनपैकी सहा क्रेन हर्षल इक्विपमेंट कंपनीच्या आहेत. कॅरीयर कूलिंगनंतर चव्हाण यांनी ही दुसरी कंपनी सुरू केली होती. हायड्रो सिजर लिफ्टमध्ये तर चव्हाण यांच्या कंपनीचा हातखंडा आहे. ही यंत्रे सिमेन्स, भारत बिजलीसारख्या अनेक कारखान्यांत वापरली जात आहेत. चव्हाण यांचा मुलगा हर्षलनेही मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन आता वडिलांच्या उद्योगात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

अनुभव मिळवण्यासाठी रात्रपाळी

काही तरी वेगळे शिकण्यासाठी चव्हाण यांनी बायर इंडियासारख्या नामांकित कंपनीला अवघ्या दोन वर्षांत रामराम ठोकला आणि थेट अंबरनाथ येथील एका रेल्वे व्ॉगन बनविणाऱ्या के. टी. स्टील या छोटय़ा कारखान्यात नोकरी करू लागले. या ठिकाणी चव्हाण यांना वेल्डिंगपासून फॅब्रिकेशनपर्यंत सर्व कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. चव्हाण यांनी या कारखान्यात काम करताना अधिकाधिक शिकण्यासाठी जाणूनबजून दुसऱ्या पाळीतील नोकरी स्वीकारली.

नवउद्योजकांना मदतीचा हात

चव्हाण यांनी नाशिक अंबरनाथ, रबाळे येथे अनेक नवउद्योजकांना त्यांचे स्वतचे इंजिनीअरिंग कारखाने उभारण्यास मदत केली. याचवेळी त्यांनी लघु उद्योजक संघटनेचे नेतृत्व केले. त्यांच्यामुळेच नवी मुंबईला ऑक्ट्रॉयचे वारे लागू शकले नाहीत. उद्योजकांच्या अनेक समस्या सोडविण्यात चव्हाण अग्रेसर होते. आजही ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक कामांत सहभागी होतात.