पनवेलच्या नव्या क्षितिजावर स्थान टिकविण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड

सरकारने सोमवारी मध्यरात्री काढलेल्या अंतिम अधिसूचनेमुळे पनवेल नगर परिषदेच्या काही मावळत्या नगरसेवकांनी आणि नगराध्यक्ष यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. कोणी फटाके फोडले, तर काहींनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोश व्यक्त केला. याच पाश्र्वभूमीवर काँग्रेसने ही बैठक घेतली. बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. पनवेल नगर परिषद, सिडको व मुंबई प्रदेश महानगर प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील गावांना एकत्र करून सरकारने महानगरपालिका जाहीर केली. याआधी नैना क्षेत्रातील गावे आणि सिडको क्षेत्रातील काही गावे यातून सरकारच्या नगरविकास विभागाने वगळल्याने येथील सामान्यांचा सूर महानगरपालिकेत या गावांचा समावेश व्हावा असा होता.

सहा महिन्यांपर्यंत नवीन पनवेल शहर महानगरपालिकेत प्रशासक बसतील आणि तोवर पनवेल परिसराच्या पहिल्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातून सुरू होईल. सुमारे पाच लाख लोकवस्तींची ही महानगरपालिकेला सिडको क्षेत्रातील खारघर परिसरातील काही नागरिक व सामाजिक संघटनांनी या महानगरपालिकेला कडाडून विरोध केला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. यावर कोणताही निर्णय न दिल्याने सरकारने जलद कृती करून महानगरपालिकेचा कारभाराला हिरवा कंदील दाखविला.

या महापालिकेच्या पहिल्या सभागृहात सदस्य म्हणून बसावे ही एकमेव इच्छा बाळगून विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे सिडको वसाहतींत आणि पनवेल नगर परिषदेच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात फलकबाजी सुरू आहे. त्यावर नवीन चेहरे दिसत आहेत.  नव्याने राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरू आहे. मंगळवारी सकाळी सरकारचा हा निर्णय

अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून अंतिम अधिसूचना कळाल्यानंतर अनेकांनी राजकीय वाटचालीसाठी बैठकांचे सत्र सुरू केल्याच पाहायला मिळाले.

पहिला नगरसेवक व्हायचंय..

आगरी समाजाचा मोठा वर्ग पनवेलमध्ये असल्याने या परिसरात नवीन होणारी पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात नाव कोरण्यासाठी बरीच वर्षे नगरसेवक पदावर असलेल्या अनेक धुरंधरांनी नवीन महानगरपालिकेतील स्थान कायम ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाचे उमेदवारीचे तिकीट स्वत:ला मिळावे यासाठी काही जणांनी मेहनत सुरू केली आहे.

महानगरपालिकेतील गावे

तळोजा पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवा, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, तोंडरे, पेणधर, कळंबोली, रोडपाली, खिडुकपाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसूडगाव, बीड, आडिवली, रोहिंजण, धानसर, पिसावे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजा मजकूर, घोट, कोयनावेळे.