ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यानंतर शेजारच्या नवी मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापौर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेते मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. विरोधी पक्षनेते बदलण्यात येणार आहेत. विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीच केलेल्या सर्वाना समान संधी या नियमानुसार त्यांच्या पदावर नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. शहरासाठी नवीन जिल्हाप्रमुख नेमला जाणार आहे. त्या पदावर चौगुले यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वत्र भाजपचा बोलबाला असताना ठाणे जिल्ह्य़ात मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे शिंदे यांचे मातोश्रीवरील वजन कमालीचे वाढले आहे. ठाणे जिल्ह्य़ाचा भाग असलेल्या नवी मुंबईवर पक्षबांधणीच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात होणारी महापौर निवडणूक नजरेसमोर ठेवण्यात आली आहे. त्यापूर्वी दोन महिन्यांनी होणाऱ्या स्थायी समिती निवडणुकीत ही प्रमुख समिती सेनेकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पालिकेत सध्या शिवसेनेचा स्थायी समिती सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष महापौर आहे. गतवर्षी शिवसेनेने साम, दाम, वापरून पालिकेची तिजोरी हस्तगत केली होती. तेव्हापासून शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून महापौर निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना आखली जात आहे. काँग्रेस, अपक्ष आणि भाजप नगरसेवकांच्या साह्य़ाने ही निवडणूक सेनेला ज्िंाकता येणे शक्य आहे अशी जोरदार चर्चा आहे. त्यात शेजारची ठाणे महापालिका जिंकल्यानंतर नवी मुंबईत शिवसेनेतील गटबाजी, हेवेदावे, असंतोष, नाराजी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतून पालकमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्या नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश दिले जात आहेत.

नवी मुंबई शिवसेनेते आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती केली जाणार आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी गटनेते द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, एम. मढवी यांच्या नावांची चर्चा आहे. चौगुले यांच्या सेना स्टाइलमुळे त्यांना पुन्हा जिल्हाप्रमुख पदी नेमले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पदावर बेलापूरचे शिवसेना संर्पकप्रमुख माजी सभापती विठ्ठल मोरे हे एक प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडणुकीत अपात्र ठरल्याने गेल्या वर्षी शिवसेनेला स्थायी समिती सभापतिपदावर विजय मिळविता आला होता. मे महिन्यात होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत या वेळीही हे पद पुन्हा मिळावे यासाठी सेना आग्रही आहे.