पनवेलमध्ये दोन दिवसांत दोन घटना

शाळकरी व महाविद्यालयीन मुलींची छेड काढणाऱ्यांना मुलींच्या पालकांनी जोडय़ांचा चोप दिल्याच्या दोन घटना गेल्या दोन दिवसांत पनवेलमध्ये घडल्या. या दोन्ही घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. छेडछाड करणाऱ्या दोघांचीही रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.

चार महिन्यांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी पनवेल बस आगारासमोर दोन तरुणांना मारल्यामुळे चर्चेत आले होते. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या या मारहाणीच्या व्हिडीओची शहानिशा केली. वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादातून तरुणांनी एका बालिकेला आणि तिच्या पालकांना लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले, असे स्पष्ट झाले होते. त्यानंतर टपोरी आणि गावगुंडांना आळा घालण्यासाठी रहिवाशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्या पाश्र्वभूमीवर या घटना घडल्या.

पनवेलमध्ये राहणाऱ्या आणि नववीत शिकणाऱ्या मुलीला गुण कमी मिळाल्याने तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन कारण विचारले असता, अनेक दिवसांपासून एक अनोळखी मुलगा शिकवणीला जाताना पाठलाग करून त्रास देत असल्याचे, तिने सांगितले. मुलीच्या पालकांनी मुलाचा शोध घेतला. विक्रम लालजी प्रजापती (२०) असे त्याचे नाव आहे. विक्रम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचा असून पनवेलमध्ये दीड वर्षांपूर्वी आला. मिळेल ते काम करणाऱ्या विक्रमला मुलीने ओळखल्यावर या मुलीच्या पालकांनी व परिसरातील रहिवाशांनी त्याला बदडून काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

दुसऱ्या घटनेत पनवेल रेल्वेस्थानक परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा हात एका मुलाने पकडला असता, तिने त्याच्या कानशिलात भडकावली. तेथून ये-जा करणाऱ्यांना ही गोष्ट कळताच, त्यांनी त्या मुलाला बेदम चोप दिला. महिला प्रवाशांनी त्याला ‘जोडय़ांचा प्रसाद’ दिला. कुंडेवहाळ परिसरात राहणाऱ्या या मुलाचे नाव अंकुश कृष्णा वाघे (२८) असे आहे. पनवेल शहर पोलिसांनी विक्रम व अंकुशवर बालकांच्या लैंगिक सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.