कांदळवनांच्या सुरक्षेसाठी न्यायलयाकडून वारंवार आदेश आणि सूचना दिल्या जात असूनही उरणमध्ये मात्र कांदळवनांवरील अतिक्रमण कमी न होता वाढतच चालले आहे. कांदळवनात मातीचा भराव आणि कचऱ्याचे ढीग टाकले जात आहेत. आग लावून तिवरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कांदळवने सरकारच्या अखत्यारीत आहेत. कांदळवनांवर भराव टाकणाऱ्या किंवा कुऱ्हाड चालवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणे ही आमची जबाबदारी आहे, त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे सांगत वन विभागाने हात वर केले आहेत.

जैवविविधता व पर्यावरणाच्या संरक्षण तसेच समतोलासाठी कांदळवने (खारफुटी) महत्त्वाची आहेत. त्यामुळे कांदळवनांबाबत कोणतीही कृती करताना न्यायालयातूनच परवानगी घ्यावी लागते. असे असले तरी उरणमधील कांदळवनांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे सुरू आहेत. फुंडे येथील सिडकोच्या सेक्टर १५ मधील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खारफुटीवर करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सिडकोने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बला जोडणाऱ्या पागोटे ते द्रोणागिरी नोड असा चौपदरी मार्ग तयार केला आहे.

या मार्गालगत भेंडखळ परिसरातील खाडी किनारी असलेल्या कांदळवनावर मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचे ढीग टाकून त्यांना आग लावली जात आहे. या आगीमुळे कांदळवने जळून नष्ट होऊ लागली आहेत. असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने कांदळवनांची सुरक्षाच ऐरणीवर आली आहे.

वन विभागाकडे कांदळवन हस्तांतरित करण्यात आलेले नाही. कांदळवनाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून त्यानंतर त्यांची वर्गवारी ठरवण्यात येणार आहे. कांदळवन हे सरकारच्या ताब्यात असल्याने ते नष्ट केल्यानंतर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे. अशा प्रकारचे गुन्हे अनेकांवर दाखल झाले असले तरी एकालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे कांदळवन नष्ट करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जात आहेत. याचा परिणाम येथील पर्यावरणावर होऊन सखल भागात समुद्राचे पाणी शिरून शेतीचे तसेच गावांचेही नुकसान होत आहे.

बी. डी. गायकवाड, संरक्षक, वनविभाग