कडक नियमावलीमुळे अनेक आयोजकांची माघार; गोविंदांचा विरस

उत्सव गोविंदांच्या जिवावर बेतू नये म्हणून करण्यात आलेले नियम आणि त्या नियमांचे पालन करून उत्सवाचे आयोजन करताना होणारी दमछाक या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील अनेक दहीहंडी आयोजकांनी यंदा माघार घेतली. चित्रपट कलाकारांची उपस्थिती, लाखोंची बक्षिसे आणि गगनाला भिडलेल्या हंडय़ांचा थरारच उत्सवातून वजा झाल्यामुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरांत दहीहंडीच्या उत्साहाची घागर उताणीच असल्याचे चित्र मंगळवारी होते. गेले कित्येक दिवस कसून सराव करणाऱ्या गोविंदांचा मात्र यामुळे विरस झाला.

वाशी, नेरुळ, बेलापूरसह विविध भागांतील राजकीय नेत्यांच्या ‘श्रीमंत’ हंडय़ा या वर्षी बांधण्यातच आल्या नाहीत. काही विभागांत अगदी साध्या पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली. नवी मुंबईलगतच्या गावांत मात्र नेहमीच्याच उत्साहात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली. गावांमध्ये मात्र पारंपरिक पद्धतीने विविध गावांत दहीहंडी साजरी करण्यात आली. सोमवारी मध्यरात्री कृष्णजन्मानंतर स्थानिक गोविंदांनी आपापल्या भागातील हंडय़ा फोडल्या. मंगळवारी ध्वजारोहण झाल्यानंतर विविध गावांतील स्थानिक पथके दहीहंडी उत्सवासाठी बाहेर पडली. नवी मुंबईत वाशी, नेरुळ, सीवूड्स, बेलापूरमध्ये मोठय़ा दहीहंडय़ांचे आयोजन करण्यात आले नव्हते. नेरुळ तसेच विविध गावांतील स्थानिक गोविंदा पथके शहरभर दहीहंडी फोडण्यासाठी फिरत होती. परंतु त्यांच्यापैकी बहुतेकांकडे सुरक्षा साधने नव्हती. मुंबई व ठाण्यातील अनेक पथके बस, टेम्पो आणि दुचाकींनी नवी मुंबईत हजर झाली होती. दुपारच्या सुमारास उत्सवाला थोडा रंग चढू लागला.

वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे कोठेही कोंडी झाली नाही. कोपरखैरणेत मात्र दहीहंडीचा उत्साह होता. नेरुळमध्येही सेक्टर १० परिसरात छोटय़ा हंडीचे आयोजन करण्यात आले होते. शिरवणे येथील शाळेच्या मैदानावर ‘विनोद सारिका मित्रमंडळा’ने दहीहंडीचे आयोजन केले होते. सीवूड्स परिसरात ‘उत्कर्ष मित्र मंडळा’ने दहीहंडीचे आयोजन केले होते. सानपाडा विभागात ‘सीताराम नाखवा मित्र मंडळा’नेही छोटय़ा दहीहंडीचे, जुईनगर परिसरात भारिपचे महेश खरे यांनी ‘निळी दहीहंडी’चे आयोजन केले होते. संध्याकाळी चारनंतर शहरात विविध ठिकाणी गोविंदा संगीताच्या तालावर नाचू लागले. पोलीस आणि वाहतूक विभागाने घेतलेली काळजी आणि मुळातच असलेला कमी प्रतिसाद यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

मद्यपींचे वांधे

यंदा दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी असल्यामुळे उत्सवाच्या नावाखाली मद्यपान करणाऱ्यांचे वांधे झाले. अर्थातच त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेला हातभारच लागला. गोविंदा पथकांबरोबर फिरणाऱ्यांमध्ये मद्यपींचे प्रमाण लक्षणीय असते. नशेत वाहन चालवणे, छेडछाड, वादविवाद असे प्रकार अधिक प्रमाणात होतात. मंगळवारी मात्र ड्राय डे असल्यामुळे शहरातील सर्वच बार आणि मद्याची दुकाने बंद होती. त्यामुळे मद्यपान नियंत्रित राहिले.

दोन गोविंदा जखमी

पनवेलच्या कोळीवाडय़ानजीक दहीहंडी फोडताना दोन गोविंदा जखमी झाले. त्यांच्या हाताला इजा झाली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कोळीवाडय़ात राहणाऱ्या या दोघांची नावे महेश (१८) व आकाश (२५) भोईर अशी आहेत.

हेल्मेटविना प्रवास

शहरभर आणि आजूबाजूच्या शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या गोविंदांपैकी बहुतेकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले होते. दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास, एका दुचाकीवरून तीन-चार जणांचा प्रवास असे प्रकार खुलेआम सुरू होते. वाहतूक पोलीसही दुर्लक्ष करत होते.

उरणमध्ये सुरक्षा वाऱ्यावर

उरण : तालुक्यात गोपाळकाला व दहीहंडी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली, मात्र थर लावताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा मंडळ आणि पथकांना विसर पडला. उरण नगरपालिकेच्या दहीहंडीला उरणमधील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांतील गोविंदा पथकांनी सहा ते आठ थर रचत सलामी दिली. गावोगावी परंपरांनुसार गोविंदा साजरा करण्यात आला.

उरण शहरात कोटनाका, तसेच बाजारात काही ठिकाणी दहीहंडय़ा लावण्यात आलेल्या होत्या, तर उरण नगरपालिकेच्या वतीने प्राथमिक शाळेच्या मैदानावर दहीहंडी लावण्यात आली होती. सहा थर लावणाऱ्या पथकांना ११ हजारांचे बक्षीस देण्यात आले. माजी नगराध्यक्ष महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे व नगरसेवक उपस्थित होते. कडेकोट बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला.

आवाज बंदीमुळे उत्सव शांततेत

डीजे व साऊंड सिस्टीम मालकांच्या संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे उत्सवात आवाजावर बरेच नियंत्रण राहिले. गोविंदांच्या उत्साहावर मात्र यामुळे पाणी पडले. नवी मुंबईला मागे टाकत पनवेलमध्ये यंदाही मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला; मात्र बहुतेक ठिकाणी उत्सवाचा आवाज ध्वनियंत्रणेअभावी दबकाच राहिला. स्वातंत्र्य दिनाची गीते आणि गोविंदाची गाणी हळू आवाजात वाजत होती.

नेरुळमधील ‘जनकल्याण मित्र मंडळा’तर्फे १९ वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असे. रात्री १२ वाजेपर्यंत पथके येत, मात्र दोन वर्षांपासून र्निबधांमुळे ही दहीहंडी बंद केली. शहरातील दहीहंडीची मजाच कमी झाली आहे.

– रवींद्र इथापे, अध्यक्ष, संस्थापक, जनकल्याण मित्र मंडळ, नेरुळ

नवी मुंबई शहरात ४१ मोठय़ा दहीहंडय़ांचे आयोजन करण्यात आले होते. दुपापर्यंत शहरात अतिशय कमी गोविंदा पथके आली. परंतु सायंकाळी उत्साह वाढला. पोलीस व्यवस्था अतिशय चोख ठेवण्यात आली होती.

– डॉ. सुधाकर पठारे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

आमच्या पथकात ३५० गोविंदा आहेत. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या, परंतु दहीहंडीचा उत्साहच नाही. मोठय़ा हंडय़ांचे आयोजनच नाही. त्यामुळे आम्ही एवढे दिवस मेहनतीने थर रचण्याचा सराव केला होता तो वाया गेला.

– देवनाथ म्हात्रे, संस्थापक,आम्ही नेरुळकर गोविंदा पथक