एकेकाळी शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवणारे शिवसैनिक त्यांची शिवसेना अशी रसातळाला जाताना बघून निराश होत आहेत. नवी मुंबईतील शिवसेनेची अशी अवस्था होण्याचे पहिले आणि प्रमुख कारण आहे. दोन गटात विभागलेली शिवसेना. यात तिसरा गट निष्ठावंत असून तो केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा आहे. नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर काही महिन्यातच ह्य़ा गटबाजीला सुरुवात झाली. त्यामुळे शहरात आता नाहटा यांचा एक गट आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा दुसरा गट असे दोन गट कार्यरत आहेत. दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्थायी समिती सदस्य निवडीवरून ही गटबाजी चव्हाटय़ावर आली. त्यात शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष घालावे लागले. चौगुले गटाच्या दोन सदस्यांवर फुल्ली मारून मातोश्रीने ही गटबाजी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेल्या वर्षीप्रमाणे स्थायी समिती सभापतीपद सहज हाती लागणार नाही असे दिसल्यावर सभापतीपदासाठी समितीत प्रवेश केलेल्या दिग्गजांनी हळूच अंग काढून घेतले. त्यानंतर झालेल्या परिवहन समिती निवडणुकीत पक्षाचे दोन सदस्य जात असताना एका सदस्यावर समाधान मानण्यात आले. मित्रपक्ष भाजपाला अतिरिक्त मते देऊन केवळ सहा नगरसेवकांच्या बळावर या पक्षाचा एक सदस्य एनएमएमटीत पाठविण्यात आला.

यामागे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या मिळणाऱ्या सहा नगरसेवकांच्या पाठिब्यांचे राजकारण आहे. या ठिकाणीही शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असती तर भाजपच्या सदस्यांना पांठिबा देऊनही पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळाली असती मात्र गटबाजी मुळे हा समझोता करता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून एकमेकांना पाण्यात बघण्याच्या नादात पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. पक्षाचा एकही सार्वजनिक कार्यक्रम होत नसल्याचे चित्र आहे. कार्यक्रम घेण्यासाठी कौल कोणाचा घ्यायचा या संभ्रमात शिवसैनिक आहेत. गटाचे शिक्के बसल्याने गप्प बसणे शिवसैनिक स्वीकारत आहेत. नाहटांना पक्षश्रेष्ठींनी उपनेता आणि बेलापूर विधानसभेची उमेदवारी देऊन विशेष दर्जा दिला आहे. पक्षाच्या वळचणीला असे सनदी अधिकारी नसल्याने नाहटा यांचे महत्त्व शिवसेना भवनात वाढविण्यात आले. त्यांना हव्या असलेल्या बेलापूर मतदार संघात पहिल्या झटक्यात उमेदवारी देण्यात आली. नाहटा यांनी सनदी अधिकारी म्हणून अनेक जिल्ह्य़ात काम केले आहे. निवृत्त होताना तर ते संपूर्ण कोकणाचे प्रतिनिधित्व करीत होते. पण नवी मुंबईच्या प्रेमापोटी त्यांना येथील उमेदवारी देण्यात आली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शिवसेनेसारख्या तळागाळातील पक्षात प्रवेश करूनही सनदी आब अद्याप डोक्यातून न गेल्याने केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम नाहटा यांनी केले आहे. त्यात सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नावाने गेल्या वर्षी जाहीर शिमगा करून कायमचे शत्रुत्व पत्करले आहे. त्यामुळे बेलापूरमधील शिवसेनेला सुरुंग लावण्याचे काम म्हात्रे यांनी हाती घेतले आहे.

नाहटा यांचा येथील जनतेशी दैनंदिन संपर्क नसल्याने नाहटांची पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरची नाळ तुटत चालली आहे. त्याऐवजी भाजपने संपर्क अभियान जोरात सुरू केले असून शिवसेनेतील चांगल्या कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. इकडे ऐरोली विधानसभा मतदार संघातही आलबेल नाही. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा सत्ताधाऱ्यांना विरोध बोथट झाला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी अतिशय सुमार दर्जाची आहे. विरोधी पक्षनेते झाल्यावर पालिकेच्या अनेक प्रकल्पांना शिवसेना स्टाईल भेटी देऊन त्या प्रकल्पांचे पुढे काय झाले याची साधी विचारणादेखील त्यांनी केलेली नाही. ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बाबासाहेबांच्या जंयती/ पुण्यतिथीपर्यंत झाले पाहिजे असे दिलेले इशारे हवेत विरून गेलेले आहेत. तो प्रकल्प आजही अपूर्ण आहे. अडवली भुतवलीतील डेब्रिज प्रश्नावरील भेटीचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता नाही. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यावर अंकुश ठेवण्यास विरोधी पक्ष कुचकामी ठरला आहे. त्यालाही पक्षांतर्गत गटबाजी हेच प्रमुख कारण आहे. गेली चार वर्षे या पक्षाला जिल्हाप्रमुख नाही. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही. चौगुले आणि नाहटा हे दोघेही आपआपल्या क्षेत्रात नेते म्हणून वावरत आहेत.  साठच्या दशकात बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते घेऊन माजी मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेची पाळेमुळे या शहरात रोवली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बेलापूर पट्टीत शिवसेनेचा भगवा फडकण्यास तब्बल २५ वर्षे लागली. राज्यात सेनेची पहिली सत्ता आल्यानंतर पालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने ठाण्यानंतर नवी मुंबईत शिवसेनेची सत्ता आली. ही यश केवळ तीन वर्षेच टिकले आणि नाईक यांच्याबरोबर सेनेची सत्ता देखील गेली. मातोश्रीची खप्पामर्जी झाल्याने त्यांनी १९९९ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर पालिकेत सत्तापालट होऊन राष्ट्रवादीची सत्ता आजतागायत कायम आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सेनेची सत्ता येण्यास खूप मोठा वाव होता, मात्र गटबाजीमुळे तोही हातातून निसटला. आता महापौर निवडणुकीत चमत्कार करण्याचे दिवास्वप्न पाहिले जात आहेत. त्यासाठी काँग्रेस व काही अपक्षांची साथ सोबत घेतली जाणार आहे.

पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता ही काँग्रेस व अपक्षांच्या टेकूवर कायम आहे. तो टिकू काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रयत्न करण्यास तयार आहेत. पनवेलमध्ये आदेशभाऊजीच्या नादाला लागून पक्षाची पुरती वाताहत झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे राज्यातील सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या सेनेला फार मोठय़ा नामुष्कीला सामोरे जावे लागले. पक्षश्रेष्ठीनी भविष्यातील महामुंबईकडे वेळीच लक्ष घातले नाही तर पनवेलसारखे पानिपत नवी मुंबईतही यायची वेळ या पक्षाच्या नेतृत्वावर येणार आहे. पूर्वी काँग्रेसला हरविण्यासाठी काँग्रेसच पुरेशी आहे अशी एक म्हण होती. ती आता शिवसेनेला लागू पडत असल्याचे दिसून येते.