‘मायक्रोसरफेसिंग’ तंत्राने डागडुजी; वेळ, खर्च वाचणार

नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पामबीच मार्गाची मायक्रो सरफेसिंग या जर्मन तंत्राच्या साहाय्याने डागडुजी करण्यास सोमवारी सुरुवात झाली. हा डांबरीकरणाला स्वस्त आणि टिकावू पर्याय असल्यामुळे पालिकेचे कोटय़वधी रुपये वाचणार आहेत. डांबरीकरणाच्या तुलनेत या तंत्रामुळे सुमारे सात ते आठ पट कमी खर्च होणार आहे. सोमवारी वाशी येथील सिटी बॅक सिग्नल येथून काम सुरू झाले. महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पनवेल, उरणसह नवी मुंबईतील बेलापूर, सीवूड्स, नेरुळ या भागांतील रहिवासीही मुंबई तसेच ठाण्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेलच्या मार्गाऐवजी वाशीपर्यंतच्या प्रवासासाठी पामबीच मार्गाला प्रधान्य देतात. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. नवी मुंबईतील तरुणांचे फिरण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी हे आवडते ठिकाण आहे. पामबीच जवळच ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ असल्यामुळे येथे पर्यटकांचीही गर्दी असते. पालिकेचे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकापासून आरेंजा कॉर्नपर्यंतचे अंतर नऊ  किलोमीटर आहे. पामबीच मार्ग सिडकोने २००७ मध्ये पालिकेला हस्तांतरित केला. तेव्हा पालिकेने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून दीड वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला जात होता, मात्र तो मंजूर करण्यात आला नव्हता. अखेर स्थायी समितीने याला नुकतीच मंजुरी दिली आणि कामाला वेग आला.

पामबीच मार्गाची लांबी नऊ किलोमीटर असून त्याचा पृष्ठभाग उखडला गेला आहे. त्यामुळे अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली होती. या मार्गावर नागमोडी वळणे असून टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले होते. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध ठेवण्यासाठी सहा ठिकाणी सिग्नलही बसविले आहेत. पालिकेने आयआयटीकडून या रस्त्याचे सुरक्षा ऑडिटही करून घेतले होते. मार्गाच्या डांबरीकरणासाठी ५२ कोटी खर्च येणार होता. मोठय़ा प्रमाणातील राडारोडा निर्माण होण्याची व ध्वनिप्रदूषणाचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. डांबरीकरणासाठी वेळही अधिक जास्त लागला असता.

मायक्रो सरफेसिंगमुळे अतिशय कमी काळात, कमी खर्चात आणि कमी प्रदूषणात हे काम होणार आहे. पालिकेने गेल्या वर्षी प्रयोगिक तत्त्वावर एनआरआय परिसरासमोरील पामबीच मार्गावर शंभर मीटरच्या रस्त्याचे मायक्रो सरफेसिंग केले होते. डांबरीकरणात रस्त्यात पाणी मुरून खड्डे पडतात; परंतु या पद्धतीत हे टाळता येते. तांडेल मैदानात या कामासाठी तात्पुरता प्लांट उभारण्यात आला आहे. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील काम ६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

असे आहे तंत्र..

* मायक्रो सरफेसिंगमध्ये पूर्ण रस्ता उखडावा लागत नाही.

*  रस्त्यावर रबर केमिकलसह पॉलिमरचा समान जाडीचा थर देण्यात येतो, त्यामुळे रस्त्यात पाणी मुरत नाही आणि खड्डे पडत नाहीत.

*  डांबरीकरण केलेला रस्ता तीन वर्षे टिकेल, अशी हमी दिली जाते, मात्र या तंत्रामुळे रस्ता किमान पाच वर्षे टिकतो.

*  हायड्रो मशीनमध्ये जवळपास १९ टन माल बसतो. या यंत्राच्या साहाय्याने रस्त्याच्या एका मार्गिकेचे तीन मीटपर्यंत सलग काम होते. रस्त्यावर आठ मिलिमीटर जाडीचा थर दिला जाणार आहे.

*  रस्त्याचे काम झाल्यानंतर काही वेळातच त्यावरून वाहतूकही सुरू करता येते. त्यामुळे पालिकेच्या पैशाची व वेळेचीही बचत होणार आहे.

दुरुस्ती अशी होईल..

* ठेकेदार – मार्क ओ लाइन

* खर्च – ७ कोटी ४८ लाख रुपये

* कामाची आदेश – १६ ऑगस्ट २०१७

* काम पूर्णत्वाची तारीख – १५ ऑक्टोबर २०१७ (पावसाचे दिवस वगळून)

वाशी-सीवूड्सला प्राधान्य

६ ऑक्टोबरपासून १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाशी सिटी बँक चौक ते सीवूड्स येथील अक्षर चौकातील काम पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अक्षर चौक ते पालिका मुख्यालयाजवळील किल्ले गावठाणपर्यंतचे काम होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पामबीच मार्ग समतल होणार आहे.

२००७ मध्ये पामबीच मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेने दुरुस्तीव्यतिरिक्त रस्त्याचे काम केले नव्हते. मायक्रो सरफेसिंगमुळे पालिकेचा सहा ते सात पट खर्च वाचला आहे. डांबरीकरणासाठी ५२ कोटींचा खर्च झाला असता. तोच खर्च ७ कोटी ४८  लाखांत होणार आहे. डांबरीकरणाची ३ वर्षांची हमी दिली जाते, परंतु या कामात ५ वर्षांची हमी मिळते. त्यामुळे पालिकेचा कोटय़वधींचा निधी वाचला आहे.

–   मोहन डगावकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका