उरण तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खारफुटीच्या जंगलाची तोड सुरू असल्याने मातीची धूप होत आहे. त्यामुळे समुद्रातील लाटांचा वेग व क्षमता वाढली आहे. या लाटांच्या वाढत्या माऱ्यामुळे उरण तालुक्यातील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याची व शेतीची धूप होऊ लागली आहे. परिणामी द्रोणागिरी डोंगराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या उरण तालुक्याची संरक्षण भिंत म्हणून ओळख असलेल्या द्रोणागिरी डोंगराला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या डोंगरामुळे येथील संरक्षण विभाग तसेच ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे संरक्षण होत आहे. या डोंगरामुळे मागील अनेक वर्षे उरण परिसराचा पूरस्थितीपासून बचाव होत आहे. तसेच रामायणातील संजीवनी ज्या पर्वतातून आणण्यात आली त्याचा भाग अशी त्याची पौराणिक महती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे महत्त्व असलेला किल्लाही या डोंगरावर आहे.

मात्र सध्या जेएनपीटीतील चौथ्या बंदरासाठी समुद्रात मातीचा भराव सुरू आहे. तसेच करंजा परिसरात मच्छीमार जेट्टी, करंजा रेवसदरम्यानची वाहतूक सेवा यासाठीही समुद्रात भरावाचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी किनाऱ्यावरील खारफुटीची तोड किंवा ती नष्ट करून बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील धूप वाढून महाकाय लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीतही पाणी शिरून त्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. अशा प्रकारे किनाऱ्याची सतत होणारी धूप न थांबल्यास याचा धोका डोंगराला होऊ शकतो. त्यामुळे या परिसरात संरक्षण बंधारा बांधण्याची मागणी करणारे निवेदन करंजा नवा पाडा येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, उरणचे तहसीलदार यांना दिले आहे.

या निवेदनानुसार धूप प्रतिबंधात्मक बंधाऱ्याची जबाबदारी आमच्या कार्यालयाकडे नसली तरी आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे करंजा विभाग अधिकारी एन. एस. कोळी यांनी दिली.