तिकीट कार्यालयासाठी जागा मिळेना; पुढच्या महिन्यापर्यंत प्रतीक्षाच

मार्चमध्ये सुरू होणे अपेक्षित असलेल्या मोरा (उरण) ते घारापुरी लाँच सेवेसाठी आता एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सेवेसाठी तिकीट बुकिंक कार्यालय न मिळाल्याने ही सेवा महिनाभर लांबणीवर पडली आहे, अशी माहिती मोरा बंदरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सेवेमुळे उरण, पनवेल, रायगड, ठाणे, नवी मुंबईतील पर्यटकांसाठी घारापुरीपर्यंत पोहोचण्याचा जवळचा व कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

जागतिक ठेवा असलेल्या उरणच्या घारापुरी बेटावरील काळ्या पाषाणातील कोरीव लेणी पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक घारापुरीला येतात, मात्र घारापुरी बेटावर जाण्यासाठी केवळ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथूनच लाँचसेवा आहे. त्यामुळे मुंबईपासून दूर असलेल्या रायगड, ठाणे जिल्ह्य़ातील तसेच नवी मुंबईतील पर्यटकांना घारापुरीपासून जवळ असूनही मुंबईला येऊन लाँच पकडण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यात वेळ आणि पैसे जास्त खर्च होतात. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने उरणच्या मोरा बंदर ते घारापुरीदरम्यान प्रवासी लाँच सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार घारापुरीतीलच एका कंपनीला ही सेवा सुरू करण्याचे काम दिले आहे.

  • प्रवासीक्षमता –   १५०
  • प्रौढांसाठी तिकीट – १२० रु.
  • बालकांसाठी तिकीट – ८० रु.
  • लागणारा वेळ – ३०-४५ मिनिटे

मोरा ते घारापुरी लाँच सेवा मरचपर्यत सुरू होणार होती; परंतु मोरा बंदरावर लाँच सेवेसाठी तिकीट कार्यालयाला जागा मिळाली नाही. त्यावर तोडगा काढत मुंबई कार्यालयाचे दोन भाग करून घारापुरीसाठी नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वेळ लागणार असल्याने विलंब होत आहे.

अरविंद सोनावणे, मोरा बंदर अधिकारी