धरण भरण्यासाठी केवळ २८ ‘एमसीएम’ पाण्याची आवश्यकता

माथेरान डोंगरातून उगम पावणाऱ्या पावसाळी नदीवर बांधण्यात आलेले खालापूर तालुक्यातील नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणात गेल्या १० वर्षांत प्रथमच जुलैमध्ये ८५.४० मीटरपर्यंत भरले आहे. त्यामुळे या महिनाअखेरीस या धरणातील पाण्याची ८८ मीटरची पातळी पार होण्याची शक्यता आहे. संपूर्ण धरण भरण्यासाठी आणखी २८ एमसीएम (मेट्रिक क्युबिक मीटर) पाणी लागणार आहे. या भागात मुंबई, ठाण्यापेक्षा तुलनेने अधिक पाऊस पडत आहे, त्यामुळे पालिकेचे धरण लवकर भरणार आहे. धरण भरल्यानंतर पालिकेच्या वतीने जलपूजन केले जाते.

राज्यात सर्वत्र पावसाने पहिल्याच महिन्यात चांगला जोर धरला आहे. नवी मुंबई पालिकेचे मोरबे धरण हे माथेरान डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या डोंगर रांगातून येणारे पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आले आहे. पावसाळ्यात या डोंगरातून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे धावरी नदी निर्माण झाली असून या नदीचे पात्र धरणासाठी वळविण्यात आले आहे. या पाणलोट क्षेत्रात गेले १५ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गेल्या १० वर्षांत प्रथमच जुलैअखेर मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धरणाच्या उत्तर दरवाजात ८५ मीटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी ८८ मीटपर्यंत पोहोचले, की धरण भरल्याचे मानले जाते; मात्र धरणाच्या मागील बाजूस पाणीसाठा पसरण्यासाठी आणखी २८ एमसीएम पाणी लागणार आहे. संपूर्ण धरण भरण्यासाठी १९१ एमसीएम पाण्याची आवश्यकता आहे पण आतापर्यंत १६३ एमसीएम पाणी जमा झाले असल्याचे समजते.

पाणीकपात टळण्याची शक्यता
पाणीसाठा कमी असल्याने गेल्या वर्षी पालिकेला ३३ टक्के पाणीकपात करावी लागली होती. या पाणीसाठय़ामुळे पालिकेला पुढील वर्षी पाणीकपात करावी लागणार नाही. याच धरणातून सिडको खारघर, कळंबोली, कामोठे या भागाला ४५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. त्यामुळे हे धरण भरण्याची येथील रहिवासी आतुरतेने वाट पाहात होते.

मोरबे धरणात दोघे बुडाले
पनवेल : पनवेल तालुक्यामधील मोरबे गावातील दोघे रविवारी सायंकाळी लहान मोरबे धरणाच्या बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने बुडाले. यशवंत गणपत पाटील (३५), राम गोपाल पाटील (५०) अशी त्यांची नावे आहेत. मोरबे गावातील तीन रहिवासी शेतजेवणासाठी शेतात गेले होते. परत येत असताना यशवंत पाटील, राम पाटील या दोघांचा पाय घसरला आणि ते बंधाऱ्याच्या पाण्यात पडले. या दोघांसोबत असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने गावकऱ्यांना ही माहिती दिली. काही तासांच्या प्रयत्नानंतर या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.