मतदान हा संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार असून तो बजावणे हे कर्तव्य असल्याचे सांगितले जात असले तरी पती मतदानाला गेल्याने स्वत:च्या दोन चिमुकल्या मुलींना गळफास देऊन पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडला आहे.

कोपरखैरणे येथील सेक्टर १९ मध्ये हरी प्रिया इमारतीत वास्तव्याला असलेल्या वावीया कुटुंबातील जागृती हिरजी वावीया(३०) या महिलेने पती हिरजी वावीया याला मतदानासाठी त्यांच्या गावी गुजरात जाण्यास विरोध केला होता. मात्र, आपल्या विरोधाला न जुमानता पती गावी गेल्याने संतापलेल्या जागृती वावीया हिने राहत्या घरी घृवीया (५) आणि वंशिका (दीड वर्षे) या स्वत:च्या दोन चिमुकल्या मुलींना गळफास देऊन स्वत: आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिचा भाऊ दिनेश दया गोठी यास फोनकरून माहिती दिली होती. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांनी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक संभाजी कटारे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.