दर्या रं माझ्या सारंगा रं.., सण आयलाय गो.. नारळी पुनवेचा.. तसेच नारळ सोन्याचा.. कोळी बांधवांचा.., अशा विविध गाण्यांच्या तालावर ताल धरत नवी मुंबईतील दिवाळे, वाशी, करावे, नेरुळ, सारसोळे येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

नारळी पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. या वेळी सजवलेल्या सोनेरी नारळाची वाद्यांच्या तालावर गावागावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात दिवाळे गाव येथील ‘सिद्धी ग्रुप’, सासोळे गावातील ‘कोलवणी माता मित्र मंडळ’ तसेच वाशी गाव येथील ‘डोलकर मित्र मंडळ’ यांनी पारंपरिक कोळीगीतांच्या तालावर नाचत खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला. कोळी बांधवांवर आशीर्वाद राहू दे, असे साकडे घातले.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरून गोंधळ..

रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण असल्याने राखी बांधण्याच्या मुहूर्तावरून संभ्रम निर्माण झाला. सकाळी साडेअकरापर्यंतच राखी बांधण्याचा मुहूर्त असल्याची चर्चा असल्याने अनेकांनी सकाळी लवकरच रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. तर काही जणांनी रविवारी संध्याकाळीच रक्षाबंधन साजरे केले.