माकप नेते सीताराम येचुरी यांची टीका

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतात सध्या भाजप व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहेत. भाजप देशात भगवा दहशतवाद पसरवीत असून सांप्रदायिक अराजकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्याला संपविण्याचे व बडय़ा उद्योगपतींना व कर्जबुडव्यांना सरकार पाठीशी घालण्याचे सत्र सरकारने सुरू केले आहे. आगामी काळात सर्व विरोधक व देशातील तमाम नागरिकांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी सीताराम येचुरी यांनी बेलापूर येथील पत्रकार परिषदेत दिला.

[jwplayer VWzZiO8q]

आग्रोळी येथील कॉम्रेड बी. टी. रणदिवे भवन येथे कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य विस्तारित समितीच्या दोनदिवसीय सभेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येचुरी म्हणाले की, भाजप सरकार लोकशाहीविरोधी कृती करीत असून सांप्रदायिक तणाव वाढवत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात सांप्रदायिक दंगली होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्र राज्य हे देशभरात विकासाच्या बाबतीत अग्रेसर असताना आज याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत भाजप महाराष्ट्र व देशपातळीवर अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील रोष प्रचंड वाढला आहे. त्यामुळे देशपातळीवर शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन पुकारून सरकारला जाग आणण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी करून परदेशातून आयात केलेल्या शेतमालाला अधिक पैसे मोजले जात असून देशातील शेतकऱ्यांच्या मालाला मात्र हमी भाव दिला जात नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत असा आरोप त्यांनी केला. एका राज्याला कर्जमाफी तर महाराष्ट्र राज्याला ठेंगा दाखवण्याचे काम भाजप करीत आहे.

राज्यसभेत सादर करण्यात येणाऱ्या आर्थिक विधेयकाला आम्ही विरोध करणार आहोत. बडे धडदांडगे व व्यापारी, राजकीय पक्ष यांच्या फायद्याच्या अनेक छुप्या गोष्टी आर्थिक विधेयकात असल्याने त्याला तीव्र विरोध करणार असल्याचे येचुरी यांनी सांगितले.

[jwplayer WaLliReZ]