प्रकल्पग्रस्तांची मागणी; आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतच्या विविध मागण्या अपूर्ण असल्याने सिडको प्रशासनाने आधी त्यांचे पुनर्वसन करावे व नंतरच विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी गुरुवारी ग्रामस्थांनी केली. उलवे गावातील हनुमान मंदिरात बैठक घेऊन नंतर त्यांनी प्रकल्पस्थळी आंदोलन केले. त्यात महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. त्यांनी सिडको प्रशासनाचे अधिकारी आणि ठाकूर म्हात्रे इन्फ्रा कंपनीच्या व्यवस्थापकांना गुलाबाचे फूल व निवेदन देऊन हे काम थांबविण्याचे आवाहन केले.

सिडको जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून त्या पूर्ण करत नाही तोपर्यंत या प्रकल्पाचे काम करू देणार नाही, अशी ठाम भूमिका या वेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी घेतली. शेतकरी काही नवीन मागत नसून सिडकोने जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी, अशी मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. शेकापने ग्रामस्थांच्या या १० गावांच्या चळवळीला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असेही बजावले.

सिडकोने नवी मुंबई वसविताना पनवेल व उरण तालुक्यातील ज्यांची जमीन संपादित केली होती, त्यांना साडेबारा टक्के योजनेचे भूखंड देण्यासाठी ३२ वर्षे लावल्याचा अनुभव ग्रामस्थांच्या गाठीशी असल्याने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याचे या वेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय शिरढोणकर यांनी स्पष्ट केले. सिडको प्रशासनाने महिन्याला २८०० रुपये मासिक खोलीभाडे देऊन घर सोडण्याचा हट्ट ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केला आहे. मात्र २८०० रुपयांमध्ये घर भाडय़ाने मिळते का, असा प्रश्न शिरढोणकर यांनी उपस्थित केला आहे. बांधकाम खर्चात वाढ मागितली आहे मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसताना सिडको प्रकल्पाचे काम सुरू का केले आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. या वेळी ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या

शून्य पात्रता असणाऱ्यांचे पुन्हा सर्वेक्षण होऊन त्यांनाही लाभार्थीचा दर्जा म्हणून बक्षीसपत्र व भूखंड मिळावेत, बांधकाम खर्चात दुपटीने वाढ व्हावी, पुनर्वसनाच्या ठिकाणी विकसित भूखंड असावेत. सिडकोने ठरविलेल्या खोलीभाडय़ाच्या रकमेत वाढ करावी अन्यथा ग्रामस्थांसाठी नव्याने खोल्या बांधून द्याव्यात, अशा मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. या बैठकीला भाजपतर्फे ठाकूर पितापुत्र उपस्थित नव्हते. मात्र या चळवळीला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

स्थानिक प्रकल्पग्रस्तांशी सिडको प्रशासन पहिल्या दिवसापासून चर्चा करत आहे. स्थलांतर व बांधकाम दरवाढीविषयी काही प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली होती. त्यावरही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. मात्र वेळोवेळी चर्चेची सर्व दारे प्रकल्पग्रस्तांसोबत खुली करूनही विमानतळाच्या उभारणीसाठीची कामे रोखणे हे योग्य नव्हे.

भूषण गगराणी, संचालक, सिडको.