अर्थसंकल्पावरील चर्चेत नगरसेवकांची मागणी

स्कायवॉकसह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवकांनी बुधवारी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत केली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प फेब्रुवारीत स्थायी समितीला सादर केला. त्यावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेत तब्बल पाच दिवस चर्चा झाली आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेत जवळपास सर्वच नगरसेवकांनी भाग घेतला. अर्थसंकल्पावर वरील चर्चेत भाग घेऊन हा सहभाग यू टय़ूबच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालयातील संगणकावर कार्यकर्त्यांना दाखवण्याची आणि त्यातून मतदारापर्यंत पोहोचण्याची आयती संधी साधली जात आहे, मात्र त्यामुळे सभागृहात रटाळ भाषणांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास येत आहे. सभागृहात नव्हे, तर जाहीर सभेच्या व्यासपीठावरच उभे असल्याचा थाटात लोकप्रतिनिधी भाषण ठोकत आहेत.

पाचव्या दिवशी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी जमा व खर्च अशा दोन्ही बाजूंनी सूचना मांडल्या. २०१५-१६ या अर्थसंकल्पात तरतूद झालेली कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे यंदा जास्तीत जास्त कामांना गती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

तुभ्रेतील रिकाम्या भूखंडावर उद्यान साकारण्याची मागणी तुर्भे येथील नगरसेविका शशिकला पाटील यांनी केली. तो भूखंड हस्तांतरित करण्यात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तेथे अतिक्रमण झाल्यावर त्यावर कारवाई करणार का, ते भूखंड लवकर हस्तांतरित करून घ्या, अशी सूचना नगरसेवकांनी केली. या प्रभागात बालवाडी रस्त्यावर भरते. मुले रस्त्यावर बसत आहेत. त्यामुळे बालवाडीच्या जागी बहुउद्देशीय इमारत व्हावी, अशी मागणी करण्यात आली. ईडब्ल्यूएस कॉलनीत गणपती बनविणाऱ्यांनी कारखाना सुरू केल्याची तक्रार करण्यात आली आहे, तरीही कारवाई केली जात नाही; मात्र प्रकल्पग्रस्तांच्या घरावर कारवाई केली जाते, असा आक्षेप घेण्यात आला. प्रभागात तुर्भे नाका येथून ते तुर्भे परिसरात येण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. तिथे स्कायवॉकची आवश्यकता आहे. याकरिता माजी खासदार संजीव नाईक यांनीही तरतूद केली होती, मात्र पावले उचलण्यात आलेली नाहीत.

नगरसेविका शुभांगी पाटील यांनी माथाडी वसाहतीत मलनि:सारण वाहिन्या टाकण्याची मागणी केली. महिला बाल कल्याणअंतर्गत प्ले ग्रुप व बालसंस्कार केंद्र सुरू करावे, खारघरचे प्रकरण निंदनीय असून प्ले ग्रुपवर नियंत्रण ठेवण्यात यावे. मनपा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्ले ग्रुप सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.

घणसोली येथील नगरसेविका कमलताई पाटील म्हणाल्या की, महापालिका शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या घणसोलीसाठी सर्वाधिक निधी देण्यात यावा. तिथे महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी झोपडपट्टी परिसराला अर्थसंकल्पामध्ये काहीच दिलेले नाही, अशी टीका केली.

पार्किंगच्या प्रश्नावर चर्चा

शहरात पार्किंगचा उग्र स्वरूप धारण करत असल्याचा मुद्द सभागृहात उपस्थित करण्यात आला. वाशीला ट्रक टर्मिनल आहे, पण गाडय़ा रस्त्यावर उभ्या असतात. सेक्टर १९मध्ये पार्किंगसाठी भूखंड आहे. तो हस्तांतरित करावा, तिथे अत्याधुनिक वाहनतळ बांधल्यास महसुलात भर पडेल, अशी सूचना करण्यात आली.