प्रायोजक नसल्याने आणि लेखापरीक्षणातील आक्षेपांमुळे सिडकोचा निर्णय

मुंबई, पुणे, ठाण्याप्रमाणे शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला नवी मुंबई फेस्टिव्हल सिडकोने अखेर गुंडाळला आहे. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर सिडकोने हा कार्यक्रम ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता, मात्र निश्चलनीकरणामुळे प्रायोजकांनी फिरवलेली पाठ आणि लेखापरीक्षणात येणारे आक्षेप यामुळे सिडकोने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमावर कायमची फुली मारल्याची चर्चा आहे.

शहरांचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोने अनेक वर्षांनंतर जानेवारी २००९ व फेब्रुवारी २०१० मध्ये नवी मुंबई फेस्टिव्हल हा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील यांनी हा उपक्रम सुरू करून नवी मुंबईकरांना एक चांगली सांस्कृतिक मेजवानी देण्याचा प्रयत्न केला होता. शहराच्या विविध दहा उपनगरांत होणाऱ्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, शास्त्रीय संगीत गायक शुभा मुदगल, परवीन सुलताना, तबलावादक तौफिक कुरेशी, शिवमणी यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती आणि नवी मुंबईकरांना आपल्या कलेने रिझवले होते. फार मोठा सांस्कृतिक वारसा नसलेल्या नवी मुंबईकरांनीही या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला होता. सलग दोन वर्षे चाललेल्या या कार्यक्रमाला नंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे व संजय भाटिया यांनी लाल बावटा दाखविला. त्यामुळे शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याचा सिडकोचा प्रयत्न मागे पडला. त्याच वेळी गेल्या वर्षी सिडकोची धुरा हाती घेतलेले कोल्हापूरकर व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी नवी मुंबई फेस्टिव्हलला हिरवा कंदील दाखविला. त्यासाठी फेब्रुवारीतील पहिला आठवडा निश्चित करण्यात आला. कार्यक्रमासाठी एक वेगळी खासगी यंत्रणा कामाला लावण्यात आली होती.

पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या महोत्सवावर प्रत्येकी दोन आणि तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यात सिडकोने ७० टक्के वाटा उचलला होता. ३० टक्क्यांसाठी विविध संस्थांचे प्रायोजक शोधण्यात आले होते. प्रायोजक शोधणाऱ्या संस्थेला यंदा ३० टक्के प्रायोजकत्व न मिळाल्याने उपक्रमावर तूर्त काट मारण्यात आली आहे.

नोव्हेंबरपासून सुरू झालेले निश्चलनीकरण याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. याशिवाय अशा कार्यक्रमाला येणारे कलाकार हे अतिशय नामवंत असल्याने त्यांचे मानधनही तेवढय़ाच पटीतील असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या रकमांवर लेखापरीक्षणात आक्षेप येण्याची शक्यता असल्याने या कार्यक्रमाला कायमचा अलविदा करण्यात आल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. दरम्यान सिडको क्षेत्रातून निर्माण झालेल्या दोन पालिका नवी मुंबई व पनवेल प्रशासनही अशा लक्षवेधी आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करीत नसल्याने नवी मुंबईकरामध्ये नाराजी आहे.