पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचा संप अखेर मागे

गेले चार दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी मागे घेतले.  त्यामुळे दिवाळीत नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी डम्पर, जेसीपी लावण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रभर कचराभूमी सुरू ठेवण्यात आली होती. गुरुवारी पालिका कर्मचांऱ्यानी हजार टन कचरा उचलला होता.

समान काम समान वेतन या मागणीसाठी त्यांनी हा बंद पुकारला होता. या काळात शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान कामगारांना वेतन तत्काळ अदा करण्याची तयारी पालिका प्रशासनाने दर्शवली. समान काम समान वेतन या मुद्दय़ावर येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. कामगार आयुक्तांच्या दालनात हा निर्णय झाल्यावर कामगारांनी संप मागे घेतला. संप मागे घेतल्यावर कामगारांनी शहरात साचलेला कचरा जमा करण्यास सुरुवात केली आहे.

समाज समता कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश लाड यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगार संपावर गेले होते. सफाई कामगारांना आरोग्य, पाणी आणि विद्युत विभागातील कामगारांनी साथ दिल्याने नवी मुंबई शहरातील सर्व सेवा कोलमडून पडल्या होत्या. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. हाजारो मेट्रिक टन कचरा रस्त्याकडेला पडून होता. गुरुवारी रस्त्यावरील कचरा पोलीस बंदोबस्तात उचलण्यास सुरुवात केल्यानंतर कामगारांनी आंदोलन आणखी तीव्र करत थेट पालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले; मात्र या कामगारांकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने कामागारांकडे संताप वाढत चालला होता. अखेर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी कामगार नेत्यांशी भेट घेऊन कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तीन महिने रखडलेले वेतन देण्याची तयारी दर्शवत समान काम समान वेतन लागू करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागून घेतली या अटीवर कामगारांनी शुक्रवारी संप मागे घेतला आहे. बंदमुळे शहरात सर्वत्र कचरा साचल्याने दुर्गधीचे साम्राज्य पसरले होते.

शुक्रवारी दुपारी ४ वाजे पर्यत ८०० टन कचरा उचलण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तुषार पवार, पालिका उपायुक्त