पालिका आयुक्तांचे वाहतूक शाखा, विभाग अधिकाऱ्यांना आदेश
लोकसेवेला प्राधान्य देत टेबल फायलीमुक्त (नस्ती) करण्यास पालिका अधिकाऱ्यांना भाग पाडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभाग अधिकाऱ्यांना कार्यालयाचा परिसर अतिक्रमण आणि फेरीवालामुक्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सात दिवसांत सर्व विभाग अधिकाऱ्यांना तसे अहवाल आयुक्तांना पाठवावे लागणार आहेत. पारदर्शक कामकाजासाठी नव्याने जारी केलेल्या नियमावली पत्रकात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून न घेण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे. तसे झाल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.
मुख्यालय ते विभाग कार्यालय अशी शिस्तीची मोहीम आयुक्त मुंढे यांनी हाती घेतली आहे. यात शहरातील पार्किंगचा विषय आयुक्तांच्या प्राधान्यक्रमात आहे. नागरिकांच्या विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पदपथ तयार करण्यात आले आहेत. ते नेहमी मोकळेच असायला हवेत, असा आयुक्तांचा आग्रह आहे. यासाठी रस्त्यांवर शिस्त न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईत वाहतूक विभागाने कोणतीही कुचराई करू नये, असे स्पष्ट केले होते. यावर वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर विभागाने मंगळवारी दिघ्यात कारवाई केली.

पालिका क्षेत्रात बहुतांशी ठिकाणी पदपथ त्याचबरोबर चौक विनापरवाना व मनमानी पार्किंगमुळे गिळंकृत करण्यात आले आहेत. यावरून पालिका आयुक्तांनी पदपथ नागरिकांकरिता खुले करण्यासाठी रस्त्यालगत उभी केलेली वाहने हटविण्याची सूचना वाहतूक पोलिसांना केली होती. दोन आठवडय़ांपूर्वी आयुक्तांनी दिघा विभाग कार्यालयाला भेट दिली. या वेळी कार्यालयाबाहेर पालिकेच्या वाहनांऐवजी इतर खासगी वाहने बेशिस्त पद्धतीने उभी करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले.