महापालिका निवडणुकांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक कामांना मंजुरी दिल्याने तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल पाच प्रकल्प गुंडाळावे लागण्याची वेळ आली. हे प्रकल्प गुंडाळल्यामुळे पालिकेचे ३० कोटी रुपये वाचणार आहेत.
महानगरपालिकेने मे महिन्यामध्ये निवडणुका होण्याअगोदर निधीची तरतूद नसतानाही १८०० कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली होती. पालिकेच्या तिजोरीत सध्या दैनंदिन सुविधांवर खर्च करण्यासदेखील निधी उपलब्ध नाही. आता पूर्वी मंजूर झालेल्या कामांची कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. घणसोली येथील क्रीडा संकुल आणि आंतरक्रीडा संकुल हे प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पावर तीन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. जलतरण तलावाचा नियोजित प्रकल्पदेखील बासनात गुंडाळण्यात आला आहे. या जलतरण तलावावर ९ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार होते. यासाठी जुहूगाव येथे भूखंडदेखील राखून ठेवण्यात आला आहे. घणसोलीमधील गवळीदेव या पर्यटनदृष्टय़ा प्रसिद्ध डोंगराचा विकास करण्याचा ध्यास आमदार संदीप नाईक यांनी घेतला आहे. या डोंगराच्या विकासावर खर्च करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली होती. मात्र आतादेखील हा प्रकल्प तूर्तास रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीअगोदर ऐरोली येथील नाटय़गृह होण्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. यासाठी १३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद पालिका अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता सध्या नाटयगृहदेखील अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे.
अर्थसंकल्प पुनर्नियोजन करण्याचा हा प्रस्ताव पालिकेच्या मासिक बैठकीत प्रशासनाने सादर केला. या सर्व प्रकल्पांसाठी भूखंड राखीव ठेवले असतानादेखील आता पालिकेच्या तिजोरीला बसलेली झळ भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाला ही कसरत करावी लागत आहे. एलबीटी रद्द झाल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. यातच स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्याने केंद्र शासनाला खूश करण्यासाठी पालिका प्रशासनाने या स्मार्ट सिटीची निवड निश्चित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. अशा अनेक प्रकल्पांच्या फाइल्स पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या कालवधीपर्यंत आता बंद करण्यात येणार आहे.