सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाची घोषणा

नवी मुंबईतील खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा आणि प्रदूषणात घट व्हावी यासाठी यंदाच्या वर्षांत महापालिका परिवहन उपक्रमाच्या तब्बल ५०० बसगाडय़ा रस्त्यावर आणण्याचा संकल्प अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पाया मजबूत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासोबत बेलापूर ते भाऊचा धक्का तसेच बेलापूर ते उरण या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. जलवाहतुकीच्या प्रस्तावाला वेग मिळावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचा यासंबंधीचा अहवाल विचारात घेतला जाणार आहे.

नवी मुंबईतील अंतर्गत वाहतुकीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षांत एनएमएमटीच्या ३२० बसगाडय़ा सेवेत आल्या होत्या. या वर्षी ४३० बस विविध मार्गावर उतरविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. यामुळे एनएमएमटीच्या दैनंदिन प्रवाशांमध्ये ३० हजारांची वाढ झाल्याचा दावा मुंढे यांनी केला. ही वाढ लक्षात घेऊन यंदा जुन्या आणि भंगारात निघालेल्या बसगाडय़ांची व्रिकी करून परिवहनच्या ताफ्यात आणखी ७० बस दाखल होतील, असे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षांत एकूण ५०० बस विविध मार्गावर सोडल्या गेल्यास शहरातील अंतर्गत वाहतुकीचा पाया भक्कम होईल सुविधांची पेरणी.. करवसुलीवर भर!तसेच प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल, असा दावा मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

एनएमएमटीच्या इतर योजना

परिवहन उपक्रम हायटेक करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या धोरणानुसार स्वाइप मशीनद्वारे पास व तिकीट देणे, स्मार्ट कार्ड उपलब्ध करणे तसेच मोबाइल अ‍ॅप या यंत्रणेद्वारे प्रवशांना बसेसच्या वेळेसंबधी माहिती देण्यात येणार आहे. परिवहन उपक्रमास आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी वाशी सेक्टर ९ सीबीडी बस स्थानक व रबाळे आगार या जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास करण्याचे नियोजन असून रबाळे येथे चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा मानस मुंढे यांनी व्यक्त केला. परिवहन उपक्रमाचा तोटा कमी करण्यासाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

जलवाहतुकीसाठी प्रयत्न

केंद्र शासनाने जलवाहतुकीचे धोरण जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने बेलापूर ते भाऊचा धक्का व बेलापूर ते उरण असे दोन जलप्रवासी जलवाहतूक मार्ग तांत्रिक दृष्टय़ा शक्य असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळ याचा अहवाल विचारात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात येईल, अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गेट वे ऑफ इंडिया ते नेरुळ या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. ठाणे महापालिकेने ठाणे ते मुंबई तसेच आसपासच्या मार्गावर अशाच पद्धतीच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. असे असताना बेलापूर ते भाऊचा धक्का आणि उरण अशा मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.