20 October 2017

News Flash

फुटबॉलसाठी पायघडय़ा, क्रिकेटकडे दुर्लक्ष

कोटय़वधी रुपये खर्चाचे मैदान दुर्लक्षित राहण्याची भीती क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

संतोष जाधव, नवी मुंबई | Updated: October 11, 2017 3:42 AM

पालिकेच्याच मालकीच्या राजीव गांधी मैदान

विभागीय प्रशिक्षण केंद्राविषयी पालिका उदासीन

आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पायघडय़ा घालण्यात गेले कित्येक महिने व्यग्र असलेल्या पालिकेचे शहरातील खेळाडूंकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पालिकेच्याच मालकीच्या राजीव गांधी मैदानावर विभागीय प्रशिक्षण केंद्र (झोनल अकॅडमी) सुरू करण्यास मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) हिरवा कंदील दाखवला असताना पालिका मात्र त्याविषयी उदासीन आहे. दोन महिने उलटूनही अद्याप पालिकेने या संदर्भात एमसीएशी साधा पत्रव्यवहारही केलेला नाही.

२८ फेब्रुवारी २००९ला राजीव गांधी स्टेडियमचे उद्घाटन झाले. तेव्हापासून या मैदानावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. पालिकेने या मैदानासाठी सुमारे १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. एमसीए फक्त मुंबईत आझाद मैदान व बीकेसी येथे उन्हाळी शिबिरे आयोजित करते आणि त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करते. त्यातून मुंबईचा क्रिकेट संघ तयार केला जातो. त्यातूनच काही खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. एमसीएच्या मुंबईतील शिबिरात सहभागी होण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून अनेक खेळाडू येतात. ही उन्हाळी शिबिरे इतरत्रही व्हावीत आणि अधिकाधिक मुलांना संधी मिळवी यासाठी मुंबई, उपनगर, ठाणे व नवी मुंबईत प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र (झोनल अकॅडमी) सुरू करण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये नवी मुंबईची प्रादेशिक प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यास एमसीएच्या सदस्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

एमसीएचे संजय गायतोंडे, विनोद देशपांडे, अरमान मलिक, शहा आलम शेख यांनी पालिकेच्या स्टेडियमची पाहणी करून या ठिकाणी झोनल अ‍ॅकॅडमी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. जूनमध्येच या कमिटीने तत्त्वत: होकारही दिला आहे. परंतु पालिका अधिकाऱ्यांनी कोणताच पाठपुरावा केलेला नाही. याच झोनल अ‍ॅकॅडमीमधून १४, १६, १९ वर्षांखालील मुलांना आणि १९ वर्षांखालील मुलींना मोफत प्रशिक्षण देऊन प्रत्येक वयोगटातील ३० चांगल्या खेळाडूंची निवड केली जाते.

त्यातूनच ही मुले मुंबई क्रिकेट संघासाठी व भविष्यात देशासाठी खेळण्याची संधी मिळवू शकतात. परंतु अद्यप पालिकेने एमसीएला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. या आठवडय़ात एमसीए प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांसाठी ठिकाणे निवडणार असून पालिकेने जर तात्काळ याबाबत हालचाल केली नाही, तर शहरातील मुलांना एमसीएकडून मिळणारी नामी संधी गमवावी लागणार आहे.

पालिकेने राजीव गांधी स्टेडियम उभारताना क्रीडा अधिकारी तसेच क्रीडा मार्गदर्शक यांनाही विचारात घेण्याची आवश्यकता आहे. रणजी सामने खेळवण्याच्या दृष्टीने या स्टेडियमची निर्मिती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोटय़वधी रुपये खर्चाचे मैदान दुर्लक्षित राहण्याची भीती क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. याच मैदानावर क्रिकेटसाठी आवश्यक तज्ज्ञ क्युरेटरचीही गरज आहे. त्याचप्रमाणे गवत कापण्याचे यंत्र आणि खेळपट्टीसाठी २ हायड्रोलिक रोलर १० लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी शेड तयार केल्यास ते वर्षांनुवर्षे टिकतील, अशी सूचना क्रीडा विभागाने केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत उपायुक्त रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

स्टेडियमचे स्वरूप

१३८  मीटर मैदानाचा व्यास

८.५  एकर क्षेत्रफळ

३०००  प्रेक्षक गॅलरीची क्षमता

०५ क्रिकेटसाठी खेळपट्टय़ा

प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत आठवडाभरातच निर्णय घेतला जाणार आहे. पालिकेने लवकर संपर्क साधला, तरच प्रशिक्षण केंद्र सुरू करता येईल.
– शहा आलम शेख, कार्यकारिणी सदस्य, एमसीए

नवी मुंबई महापालिकेने सुसज्ज राजीव गांधी स्टेडियम उभारले आहे. तिथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास ती येथील खेळाडूंसाठी मोठी संधी ठरणार आहे. शहरात क्रीडाविषयक निर्णय घेतले जाताना क्रीडा विभागाला विचारात घेतले जात नाही. स्टेडियम बनवतानाही खेळाबद्दल अधिक माहिती असणाऱ्यांना विचारात घेतले पाहिजे. पालिकेने तात्काळ याबाबत हालचाली करणे आवश्यक आहे. 

-विकास साटम, क्रीडा मार्गदर्शक

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रयत्नशील आहे. विभागीय प्रशिक्षण केंद्राबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

First Published on October 11, 2017 3:42 am

Web Title: navi mumbai municipal corporation depressed about zonal cricket academy