राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

मे महिन्यात पार पडलेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत हे पद पुन्हा खिशात टाकता न आल्याने शिवसेनेने आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांशी संपर्क साधला जात असून त्यातील ११ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचा दावा केला जात आहे. महापौर निवडणुकीत हे नगरसेवक शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतील आणि महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार विराजमान होईल, अशी चर्चा आहे.

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांची अडीच वर्षांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन महापौराची निवड होणार आहे. या वेळचे महापौर पद मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेने राजकीय खेळी करून राष्ट्रवादीच्या ताब्यातील स्थायी समिती सभापतिपद खेचून आणले होते. तेव्हापासून महापौर पदही काबीज करण्याचे दावे शिवसेनेकडून केले जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे महापौर पदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत फार मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होणार असल्याने पक्ष चांगली आर्थिक कुवत असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहे. स्थायी समिती पदावर विजय मिळविणे शक्य असल्याचे सांगूनच चार महिन्यांपूर्वी चौगुले यांनी स्थायी समितीत शिरकाव केला आहे. महापौर निवडणुकीच्या तयारीसाठी चौगुले यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून राष्ट्रवादीतील असंतुष्ट आत्म्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात ११ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात येण्यास तयार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचा वाशीतील एक मोठा गट फुटण्याच्या तयारीत असून ते भाजपवासी होणार असल्याचे समजते. भाजपबरोबर आधीच समझोता केलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचा महापौर पदाचा उमेदवार शेवटच्या क्षणी ठरणार आहे. यापूर्वी चौगुले यांचा एकदा खासदारकीच्या, तर दोनदा आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांची ही एक शेवटची राजकीय खेळी ठरणार आहे.

अर्थपूर्ण व्यवहार?

पक्षांतरासाठी नगरसेवकांना निवडणुकीत केलेला सर्व खर्च आणि गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कमाईपेक्षा अधिक पैसे देण्याचे आश्वासन दिले जात आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ ५२ असून ते काठावरचे संख्याबळ मानले जाते. काँग्रेसच्या १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावरच राष्ट्रवादीचा तंबू उभा आहे. त्याबदल्यात काँग्रेसला उपमहापौपद व काही विशेष समित्या मिळाल्या आहेत.