प्रशासकीय अनियिमततेवरून कारवाई; मालमत्ता विभागातील कामकाजाची चौकशी होणार

नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाचे उपायुक्त दर्जाचे कर संकलक प्रकाश कुलकर्णी यांना पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी प्रशासकीय अनियिमततेवरून निलंबित केले आहे. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची ही पालिकेतील पहिलीच वेळ आहे. सोमवारी झालेल्या विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी कुलकर्णी यांना सूचक इशारा दिला होता. तरीही त्यांनी कामात सुधारणा न केल्याने आयुक्तांनी पुढील आदेश होईपर्यंत त्यांना घरी बसविले असून चौकशी सुरू केली आहे.

आयुक्त मुंढे यांनी दर आठवडय़ाला प्रत्येक विभाग अधिकाऱ्याचा कामाचा लेखा जोखा सोमवारच्या विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंतच्या अनेक आयुक्तांना खिशात घालण्याच्या सरावामुळे मालमत्ता विभागाचे सर्वेसर्वा कुलकर्णी यांनी तीन आठवडय़ातील अहवालात टंगळमंगळ केल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी मुंढे यांनी कुलकर्णी यांना निलंबित करून त्यांच्या जागी उपकर विभागाचे उपायुक्त उमेश वाघ यांची प्रभारी नियुक्ती केली. मालमत्ता विभागाचा गेली अनेक वर्षे कारभार संशयास्पद सुरू असल्याने आयुक्तांनी कुलकर्णी यांना विभाग बैठकीत सज्जड दम भरला होता. कुलकर्णी या विभागात नऊ वर्षे कर संकलक म्हणून काम पाहत असून मालमत्तांच्या नोंदी ठेवण्यात अनागोंदी झालेली आहे. शहरातील उद्योजकांकडून मालमत्ता कर योग्य प्रकारे वसूल केला जात नसल्याने पालिकेसाठी काम करण्याचा सल्ला आयुक्तांनी पहिल्याच दिवशी या विभागाला दिला होता. शहरात पावणेतीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ता असून वर्षांला ८५० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल अपेक्षित आहे, पण हा कर कधीच पूर्ण वसूल होत नसल्याचे आढळून आले आहे. शहरात छोटे मोठे साडेतीन हजार उद्योजक आणि ३५ हजार व्यापारी आणि विकासक आहेत. त्यांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावून नंतर त्यात तडजोड करण्याची या विभागाची कला सर्वज्ञात आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी अनेक वर्षे खुच्र्या सोडण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.

याच मलईदार कमाईवर अनेक अधिकाऱ्यांनी गावी जमिनी आणि कारखाने उभारले आहेत. मालमत्ता कर वसूल करताना भाडय़ाने दिलेल्या मालमत्तेसाठी वेगळा कर आकारला जात आहे. त्याचे दर पालिका दर वर्षी जाहीर करीत आहे.

वाशी सेक्टर १९ डमधील भूखंड क्रमांक २० वर असलेल्या सतरा प्लाझा या इमारतीत अनेक व्यावसायिक गाळे आहेत. त्यातील २१ वाणिज्य गाळ्यांना कोणत्या दराने कर आकारण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून किती वसुली केली गेली आहे, याची चौकशी केल्यानंतर या विभागाचे अनेक गौडबंगाल बाहेर येणार आहेत.

या वाणिज्य संकुलातील एका गाळ्याचे मासिक भाडे दीड लाख रुपये गृहीत धरल्यास बारा महिन्यांचे १८ लाख रुपये भाडे मालकाला मिळत आहे. त्यावर दहा टक्के करपात्र मूल्य अपेक्षित असताना या वाणिज्य गाळ्याचे भाडे कमी दाखविण्यात आले आहे. हीच स्थिती वाशी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या दोन मॉल्समधील गाळ्यांची आहे.

कुलकर्णी कुटुंब सोलापूर जिल्हातील करमाळा तालुक्यातील एक मोठे प्रस्थ मानले जाते. त्यामुळे सोलापूरहून आलेल्या मुंढे यांना कुलकर्णी यांची कुंडली चांगलीच माहीत आहे. कुलकर्णी यांच्या एका भावाने मागील विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याची संपूर्ण तयारी केली होती. त्यांच्या राजकरणासाठी लागणारी रसद कुलकर्णी नवी मुंबईतून पुरवीत होते मात्र त्यांची हत्या झाल्याने कुलकर्णी यांची गणिते कोलमडून गेली होती. त्यांची जागा घेण्यासाठी पालिका सेवेचा राजिनामा देऊन कुलकर्णी लवकरच राजकारणात प्रवेश करणार होते. त्यामुळे निलंबन हे त्यांच्या भावी राजकीय महत्त्वाकांक्षेला अडथळा ठरणारे असल्याने राजिनामा देतो पण निलंबन नको असे आर्जव त्यांनी केले आहे. त्यांच्या निलंबनानंतर त्यांची सर्व चौकशी केली जाणार असल्याचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सांगितले.