कामातील अनियमिततांमुळे पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा
कामातील अनियमिततांमुळे नवी मुंबई पालिकेतील सहा अधिकारी कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाचा बडगा उगारणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जागेवर निर्णय घेण्याच्या ‘नायक’ स्टाइलमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यात एक प्रकारची धास्ती वाढली आहे. त्यामुळे जळी, काष्ठी, पाषाणी सध्या या कर्मचाऱ्यांना आयुक्त दिसत आहेत. सहा महिन्यांत पालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करण्याचा विचार नुकताच आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
दिघा येथील विभाग कार्यालयाला भेट देणाऱ्या आयुक्तांनी तेथील एका स्वच्छता निरीक्षकाला सर्वप्रथम नारळ दिला. त्यानंतर कारवाईची ही धडक मोहीम सुरू झाली असून मालमत्ता विभागाचे कर निर्धारक उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांना आयुक्तांनी घरी बसविले. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून यात कुलकर्णी यांच्या अनेक कृष्णलीला बाहेर पडण्याची शक्यता आहे. याशिवाय तीन वर्षांपूर्वी ऐरोली विभागात काम करणारे प्रभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील व साहेबराव पाटील यांना आयुक्तांनी एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याने निलंबित केले आहे. यात साहेबराव पाटील दिघा येथे प्रभाग अधिकारी असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले होते. ते आता साहाय्यक आयुक्त झाले आहेत. साहाय्यक लेखा अधिकारी सुभाष सोनावणे यांनाही आयुक्तांनी दोषी ठरवून घरचा रस्ता दाखविला आहे.
त्यामुळे एक महिना पूर्ण होण्याअगोदर आयुक्तांनी सहा अधिकारी व एक कंत्राटी कामगाराला शिक्षा दिल्याने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या एखाद्या चुकीची शिक्षा अशीच मिळेल का, या धास्तीने कर्मचारी अधिकारी सुन्न झाले असून घरात ताणतणाव वाढला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुलांच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत तर काही महाविद्यालयीन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे घरात पती-पत्नी मुलांसमोर आयुक्तांचा विषय चर्चिला जात असून अनेकांचे बीपी, शुगर वाढले आहेत. काम करताना चुका तर होणारच पण त्याची इतकी मोठी शिक्षा अपेक्षित नाही, असेही कर्मचारी खासगीत सांगू लागले आहेत. यात पालिकेत गेली अनेक वर्षे केवळ भ्रष्टाचाराचे करून वाढविणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी या चक्रव्यहात अडकले असल्याची चर्चा आहे.
राज्यातील एक श्रीमंत व मोठे महामंडळ असलेल्या सिडको प्राधिकरणाची बदनाम झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षे चांगले प्रयत्न केले पण त्यासाठी प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात बसविले नाही. त्याकरिता कामगार संघटनेबरोबर सुसंवाद वाढवून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेतले.

यापूर्वी काय झाले हे मला माहीत नाही पण यानंतर पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे, असे पहिल्याच भेटीत त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाटिया यांच्या निरोप सभारंभाला अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. आयुक्तांनी ‘जरा दमाने’ घेण्याचा सल्लाही शहरातील काही ज्येष्ठ नागरिक देत आहेत. पालिकेतील अनागोंदी, भ्रष्टाचार, शिथिलता सर्वज्ञात आहे, त्याला शिस्त लावण्याचे काम आयुक्त करीत असताना कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचाही विचार करण्यात, यावा अशी चर्चा आहे.