शिवसेनेच्या पाच व राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांची नियुक्ती

स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी देण्यात आलेली शिवसेनेच्या पाच नगरसेवकांची नावे बदलण्यात यावीत यासाठी राजीनाम्याची स्टंटबाजी करणारे उपनेते विजय नाहटा यांना त्यांचे विरोधक-विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शह दिला आहे. चौगुले गटातील दोन नगरसेवकांच्या नावावर काट मारून नहाटा गटातील दोन नगरसेविकांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली. बुधवारी शिवसेनेच्या पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेनेतील यादवी चव्हाटय़ावर आली. स्थायी समितीसाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेते सरोज पाटील, गटनेते द्वारकानाथ भोईर आणि जेष्ठ नगरसेवक नामदेव भगत, रंगनाथ औटी यांची नावे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याला उपनेते विजय नाहटा यांनी आक्षेप घेतला होता. चौगुले, भगत, पाटील, भोईर यांना यापूर्वी महत्वाची पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या ऐवजी नवीन नगरसेवकांना संधी द्यावी अशी मागणी करून रााजिनामे देण्याची धमकी त्यांनी दिली. मातोश्रीने या धमकीची दखल घेतली पण चौगुले, भगत आणि भोईर या पदाधिकाऱ्यांच्या नावांना धक्का न लावता औटी व पाटील यांना नारळ दिला. त्यांच्या ऐवजी दिपाली सकपाळ आणि ऋचा पाटील या दोन नगरसेविकांची नियुक्ती करण्यात आली.

महानगरपालिकेचे वैधानिक पद शिवसेनेमध्ये निवडणुकीआधी प्रवेश केलेल्या नगरसेवकांना दिले जात असल्याने शिवसेनेच्या १८ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावत उपनेते विजय नाहटा व बेलापूर संपर्कप्रमुख माजी नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले होते. नगरसेवकांचा एक गट विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांच्याविरोधात गेल्याने या राजकीय घडामोडींना वेग आला होता. याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडल्यावर उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची बैठक ‘मातोश्री’वर झाली. यानंतर तोडगा काढत विजय नाहटा गटातील ऋचा पाटील व दीपाली संकपाळ या दोन नगरसेविकांना स्थायी समिती सदस्य म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाहटा व मोरे गटाला चौगुले व भगत यांच्या नावाला मातोश्रीने कात्री लावणे अभिप्रेत होते. मातोश्रीने चौगुले यांच्या नावावर काट मारली असती तर नाहटा गट खूश झाला असता पण ते न झाल्याने पालकमंत्री शिंदे व चौगुले यांचे पालिकेतील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, स्थायी समितीचे मावळते सभापती शिवराम पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह शिवसेनेच्या ३८ पैकी २५ नगरसेवक सभागृहात हजर नव्हते. अवघ्या १३ नगरसेवकांच्या उपस्थितीत या नावांची घोषणा करण्यात आली.

भाजपचे देखील सहापैकी अवघे दोनच नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नावांचा घोळ कायम होता, मात्र देविदास हांडे-पाटील, अशोक गावडे व सुरेश कुलकर्णी यांना संधी देण्यात आली.

आता चुरस सभापतिपदासाठी

स्थायी समिती सभापतीची निवड पुढील आठवडय़ात होणार आहे. शिवसेनेकडून विजय चौगुले हे प्रबळ दावेदार असून राष्ट्रवादीकडून सुरेश कुलकर्णी व अशोक गावडे यांच्यात चुरस असणार आहे. सध्या राष्ट्रवादीचे सात, काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचे आठ असे संख्याबळ असल्याने स्थायी समितीत सभापतीची निवडणूक अटीतटीची होणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा एक सदस्य अपात्र ठरल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सभापतिपद खेचून आणले होते. शिवराम पाटील यांच्याकडे सभापतिपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र आता समान बलाबल असल्याने कदाचित चिठ्ठी टाकून सभापती निवडावा लागेल अथवा काँग्रेसच्या मदतीने सभापती निश्चित करण्यात येईल.

काँग्रेसच्या मीरा पाटील कोणाच्या पारडय़ात मत टाकतात यावर सभापती ठरणार आहे. मात्र आजच्या सदस्य निवडीमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या गटातील सरोज पाटील व रंगनाथ औटी यांचा पत्ता कट झाल्याने चौगुले यांना हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी सरोज पाटील या सभागृहामधून निघून गेल्या. नाहटा व चौगुले गटातील नगरसेवक या महत्त्वाच्या सभेत फिरकले नसल्याने शिवसेनेतील नाराजी तात्पुरती दूर झाली असली तरी आगामी काळात हा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

पाटील, औटी नाराज

चौगुले नाहटा या दोन गटांतील यादवीत पाटील व औटी यांना संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही नगरसेवक नाराज असून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. २० नगरसेवकांचा विरोध डावलून चौगुले व भगत यांना मातोश्रीने कायम ठेवल्याने ही नाराजी आता वाढणार आहे. मे महिन्यातील स्थाायी समिती सभापती व ऑक्टोबर महिन्यातील महापौर निवडणूक जवळ आली असताना शिवसेनतील वाद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. त्याचवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीने ह्य़ा दोन्ही निवडणुका एकत्र लढवण्याचे ठरविले आहे. पालिकेत राष्ट्रवादीला साथ द्या असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना मंगळवारी दिले.