सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून पनवेल रेल्वे स्थानक गाठण्याचे पनवेलकरांचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) पनवेलसाठीच्या बससेवेचा शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पनवेल नगरपालिका कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रा शिर्के, परिवहन सभापती साबू डॅनियल, पनवेल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चारुशिला घरत, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, नगरसेवक शिवदास कांबळे, एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, कफ संघटनेचे अरुण भिसे आदी उपस्थित होते.
पनवेलमध्ये एकेकाळी टांगे धावत असत, कालांतराने रिक्षा आल्या, पुढे सहा आसनी रिक्षाही आल्या. मात्र जिला सार्वजनिक परिवहन सेवा म्हणता येईल, अशी सेवा या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू होणे ही आनंदाची बाब आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले. स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्यासाठी पनवेल पालिका गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असून लवकरच ती सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बस पूर्ण शहरातून धावणार नसल्याने रिक्षाचालकांनी काळजी करू नये असे सांगत नागरिकांनी या बससेवेचा पुरेपूर उपयोग करावा व ती किमान ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालेल, असे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सेवेच्या माध्यमातून आम्ही आमच्या शेजाऱ्यांना सहकार्य करू शकत असल्याचा आनंद वेगळाच आहे, अशी भावना नेत्रा शिर्के यांनी व्यक्त केली.
या बसच्या मार्गात वाहतूक कोंडी होणार नाही तसेच तेथील रस्ते उत्तम प्रतीचे असतील, याची नगरपालिकेने काळजी घ्यावी, अशी सूचना या उपक्रमासाठी पाठपुरावा करणाऱ्या कफ संघटनेचे अरुण भिसे यांनी केली. सध्या ही बस एकाच मार्गावरून धावणार असून त्यात विस्तार व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
एनएमएमटीचे चालक विनोद पाटील व वाहक समाधान मोकल हे या शुभारंभाचे मानकरी ठरले. आमदार ठाकूर, नेत्रा शिर्के यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या पहिल्या प्रवासात सर्वसामान्यांसह उत्साहात सामील झाले.
एनएमएमटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ३३ आसनी गाडय़ा या सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. या गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सात, नऊ व अकरा अशा तीन टप्प्यांमध्ये तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे. ७५ क्रमांकाच्या मार्गावरून दोन बसगाडय़ा एनएमएमटीने सुरू केल्या आहेत. पनवेलच्या साईनगर येथून सकाळी सात वाजता सुटणारी बस पनवेल पावणे पाच किमी.चे अंतर कापून अठरा मिनिटांत रेल्वेस्थानकात पोहचेल. त्यानंतर ही बस दिवसभरात चाळीस फेऱ्या मारेल. साईनगर ते रेल्वेस्थानक या दरम्यान १६ थांबे आहेत. पनवेल स्थानकातून रात्री आठ वाजून ५५ मिनिटांनी तर साईनगरहून रात्री सव्वानऊ वाजता अंतिम बस सुटेल.