व्यापाऱ्याची लूट, बालिकेला मारहाणप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांकडे पोलीस आयुक्तांची डोळेझाक

शीघ्र कृती दलामध्ये कार्यरत पोलिसांनी नोटा बदलण्याच्या नावाखाली खांदेश्वरमधील व्यापाऱ्याकडून ४६ लाख रुपये लुबाडल्याचे प्रकरण आणि खारघर येथील पूर्वा प्ले ग्रुपमध्ये नऊ महिन्यांच्या बालिकेला झालेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात केलेली चालढकल या दोन्ही प्रकरणांमुळे नवी मुंबई पोलिसांच्या अप्रामाणिकपणाचे पितळ उघडे पडले आहे. एवढे सगळे होऊनही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आयुक्त गप्प का असा प्रश्न नवी मुंबईवासियांना पडला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात थातुरमातुर कारवाई करून वेळ मारून नेण्याच्या वृत्तीवर टीका होत आहे.

पावणेचार हजार पोलिसांच्या हाती सुमारे २२ लाख लोकवस्तीची सुरक्षा सोपवण्यात आली आहे, मात्र काही कामचुकार आणि अप्रामाणिक पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. नवी मुंबई पोलीस दलाच्या मुख्यालयातील शीघ्र कृती दलात कार्यरत पोलिसांनी आपल्या खबऱ्याच्या मदतीने मुंबईतील एका व्यापाऱ्याला खांदेश्वरमध्ये नोटाबदली करून देतो, म्हणून बोलावून घेतले. सेक्टर १० मध्ये बनावट सापळा रचून या व्यापाऱ्याकडून ४६ लाख रुपयांची रोकड घेऊन ते पसार झाले. ज्या व्यक्तीने पोलिसांना याप्रकरणात मदत केली त्याने या व्यापाऱ्याला गळाला लावले होते. व्यापाऱ्याने काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर आपली पोलिसांनी जप्त केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. पोलिसांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे हे प्रकरण गेले. त्यांनी रीतसर गुन्हा दाखल करावा, मात्र कुठेही वाच्यता करू नये असा आदेश दिला. ११ नोव्हेंबरला घडलेली ही घटना आयुक्तांपर्यंत पोहचण्यासाठी डिसेंबरची २ तारीख उजाडली. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे या प्रकरणाबाबत न बोलण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे वेळोवेळी पत्रकारांना आपल्या कामगिरीची माहिती सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांचे फोन टाळले आहेत.

२१ नोव्हेंबरच्या खारघर येथील पूर्वा प्ले ग्रुपच्या प्रकरणामध्ये ज्या बालिकेला मारहाण झाली तिच्या आईची तक्रार त्वरित नोंदवून घेण्याऐवजी टाळाटाळ करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या खारघर पोलीस ठाण्यात तक्रारदारांना पिण्याचे पाणी, चहा व गुलाब देण्याची परंपरा खुद्द तत्कालीन आयुक्तांनी सुरू केली होती, त्याच पोलीस ठाण्यात एक आई न्यायासाठी पोलिसांसोबत झगडत होती. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणल्यावर पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणाच्या गुन्ह्य़ासोबत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास एका अधिकाऱ्याकडून काढून दुसऱ्या अधिकाऱ्याला दिला आणि हात झटकले. पंधरा दिवस उलटले तरी पूर्वा प्ले ग्रुपच्या मालकांना का अटक झालेली नाही. पीडित बालिकेच्या आईने गेल्या आठवडय़ात आयुक्तांची भेट घेतली. स्वत आयुक्तांनी मी पाहतो असे आश्वासन दिले. प्रसारमाध्यमांमध्ये वाच्यता होऊ नये म्हणून अफसानाच्या पोलीस कोठडीनंतर पोलिसांनी माध्यमांना माहिती देणे बंद केले. ज्या अधिकाऱ्यांनी पूर्वा प्ले ग्रुपच्या प्रकरणात दिरंगाई केली त्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. या घटनेतील हलगर्जीपणामुळे गुन्हा दाखल असलेल्या प्रियंका हिला जामीन मिळाल्याने तिने न्यायालय किंवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले नाही. प्रियंका सध्या अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ करत आहे. याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

‘दरोडेखोर पोलिसां’ना पाठबळ

एरवी दरोडेखोर, चोर व भुरटय़ा चोरांना पकडले तरी प्रसारमाध्यमांना बोलावून माहिती देणारे, प्रसिद्धिपत्रक काढून आयुक्तालयात पत्रकार परिषदा घेणारे पोलीस दल सध्या या दोनही प्रकरणांची माहिती कुठेही पसरू नये म्हणून मूग गिळून गप्प आहे. पोलिसांनी केलेल्या लुटीच्या प्रकरणातील आरोपींची संख्या किती, त्यामध्ये किती पोलिसांचा समावेश होता आणि खासगी व्यक्ती किती याचा तपशील गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले तरीही दिला जात नाही. पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे हे पोलीस नेमणुकीचे ठिकाण सोडून इतर ठिकाणी कसे गेले याविषयी संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या पोलिसांना पाठबळ होते का, असाही प्रश्न प्रामाणिक कर्मचाऱ्यांना पडला आहे. नवी मुंबई तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांनी आपल्या पारदर्शी कारभारामुळे अनेक बेशिस्त पोलिसांना घरी बसण्यास भाग पाडले. मात्र पनवेल परिसरातील या दोन घटनांमुळे आयुक्त नगराळे यांचे पनवेलवर केवळ कार्यक्रमांपुरतेच लक्ष असून बेशिस्तपणाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.