राजशिष्टाचाराचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना भाषण करू न दिल्याने राजशिष्टाचाराच्या वादात पडलेल्या ठिणगीने चांगलाच पेट घेतला आहे. अशातच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सभारंभात माजी खासदार संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईक यांची नावे आमदार म्हात्रे यांच्या अगोदर नमूद केल्याने हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईत सध्या दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली आहेत. बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे या भाजपच्या आहेत, तर ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर येथील खासदार भाजप-सेना युतीचे आहेत. पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सरकार आहे. पालिकेच्या कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने गणेश नाईक यांचे नाव अग्रस्थानी टाकले जाते, त्यानंतर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव प्रसिद्ध केले जात आहे. म्हात्रे यांनी नाईकांचा पराभव केला असल्याने या क्रमवारीवरून त्या संतप्त आहेत. मध्यंतरी गणेश दर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात म्हात्रे यांना आमंत्रित केल्यानंतरही त्यांचे भाषण न होण्याची ‘काळजी’ महापौर सुधाकर नाईक यांनी घेतली. या कार्यक्रमात खासदार राजन विचारे यांच्या भाषणानंतर थेट महापौर सोनावणे व नंतर गणेश नाईक यांचे भाषण झाले. त्यामुळे म्हात्रे यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी त्याच ठिकाणी महापौरांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची घोषणा केली. हे मानापमान नाटय़ शमत नाही तोच १ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने पालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक यांच्या नावांनंतर आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव छापण्यात आले होते. त्यामुळे हा राजशिष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. खासदार राजन विचारे, आमदार म्हात्रे व विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी युतीच्या सर्व नगरसेवकांसह आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली.
याच काळात दिघा येथील बेकायदा इमारती पाडण्याच्या कारवाईला शासनाने स्थगिती द्यावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजन विचारे, मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी राजशिष्टाचाराचा हा मुद्दा पुढे मांडण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना लेखी तक्रार करण्यास सांगितले. तशी तक्रार दिल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी जोशी यांना सत्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
मुंबई व ठाण्यात सेनेची सत्ता असल्याने तेथे होणाऱ्या मोठय़ा कार्यक्रमांसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केले जाते व त्यांच्यानंतर पालकमंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांची नावे छापली जातात, असा युक्तिवाद राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
या संदर्भात पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता राजशिष्टाचारानुसार विद्यमान आमदार, खासदारांची नावे शासकीय निमंत्रण पत्रिकेत समाविष्ट करणे बंधनकारक आहे. मात्र त्या नावांचा क्रम कसा असावा हे अधिकार महापौरांचे आहेत, असे सांगण्यात आले.
येथील पक्षप्रमुख म्हणून माजी मंत्री गणेश नाईक यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत समाविष्ट करणे हे एकवेळ समजण्यासारखे आहे, परंतु माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांचा काय संबंध, ते कळत नाही. उद्या यांच्या नातवांची नावेही टाकली जातील, तेही सहन करावे का? ही मंडळी पराभव झाल्याचे मान्य का करीत नाहीत, असा आमचा प्रश्न आहे.
मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर
पालिकेच्या कार्यक्रमांतील राजशिष्टाचाराबाबतचे सर्व अधिकार महापौरांना असतात. एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक मुख्य अतिथी म्हणून ठरले तर त्यांचे नाव सर्वप्रथम छापले जाणार हे निश्चित आहे. त्यानंतरच स्थानिक खासदार, आमदार व नगरसेवकांची नावे छापली जाणे योग्य आहे. नावांच्या क्रमावरून इतका आकांडतांडव का केला जात आहे, हे कळेनासे आहे.                  सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई