नवी मुंबई महानगरपालिकेने शनिवारी १८७ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर गत २९ वर्षांपासून धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी रविवारी मोर्चा काढला. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीच्या पुनर्बाधणीचा प्रश्न झुलवत ठेवला आहे. शासनाच्या समित्यांनी इमारती धोकादायक असल्याचा अहवाल देऊनही सिडको आणि पालिका प्रशासनातील अधिकारी आणि काही माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे या इमारतीचा पुनर्बाधणीचा प्रश्न रखडून ठेवला आहे. त्यामुळे माहिती अधिकारी कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी मोर्चा काढला. वाशी सेक्टर ९ येथील अलबेला टॉवर येथून निषेध मोर्चाला सुरुवात होऊन वाशी सेक्टर १० येथील श्रद्धा असोसिएशनमध्ये या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या विकासकामाच्या अडथळयास पालिका सिडको प्रशासनाबरोबर माहिती अधिकार वापरणारे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.