नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना सहकार्य करण्याची पक्षाची भूमिका; विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची माहिती

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना भेटीची वेळ देत नाहीत तोवर स्थायी समिती सभा तहकूब करण्याचा सभापती शिवराम पाटील यांनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विजय चौगुले यांनी पाटील यांच्या या निर्णयाची माहिती वरिष्ठांना दिली आहे. पालिका आयुक्त मुंढे यांना सहकार्य करण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई पालिकेची स्थायी समिती सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली. सभेला आलेले अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याकडे सभापती शिवराम पाटील यांनी नगरसेवकांच्या वेळेची विचारणा केली. आयुक्तांनी अद्याप अशी कोणतीही वेळ दिलेली नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. यापूर्वीचे आयुक्त हे नगरसेवकांच्या समस्या ऐकण्यासाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवत असत. त्यामुळे नगरसेवकांना आयुक्त वेळ देणार नसतील तर सभापतीची ही खुर्ची सांभाळण्यात काय अर्थ आहे असे स्पष्ट करून पाटील यांनी वेळ नाही, तर सभा नाही, असे सांगितले.

आयुक्त मुंढे यांच्या विरोधात सध्या सर्वपक्षीय नगरसेवक एकटवले आहेत. त्यामुळे सभापतींच्या या निर्णयाला पाठिंबा देऊन ही सभा आटोपती घेण्यात आली. पाटील हे असा काही निर्णय घेतील याची कल्पना पक्षश्रेष्ठींना देण्यात आली नव्हती. मुंढे यांना नवी मुंबईतील जनतेकडून जोरदार पाठिंबा आणि समर्थन मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना विरोध न करण्याचे ठरविले असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या बंदमध्ये शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली. यात बेलापूर मतदारसंघाचे संपर्क नेते विठ्ठल मोरे यांनी सहभाग घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या सेना पाठीशी असल्याचे स्पष्ट केले; पण नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती.