राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढीव देयकांच्या विरोधात मोर्चा
चार घरांची धुणीभांडी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला मशेदुणे या साठेनगरमधील महिलेला महावितरणने सप्टेंबर महिन्याचे ४५ हजार रुपयांचे देयक धाडल्याने त्या कुटुंबीयांना जोरदार ‘शॉक’ बसला. इतके पैसे भरायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अन्य एका प्रकरणात संपत खैरणे यांना नऊ हजारांवरून थेट १८ हजारांचे देयक पाठविण्यात आले आहे तर सदानंद दरेकर यांच्या हाती साडेपाच हजार रुपयांचे देयक आहे. नवी मुंबईतील वीज ग्राहकांची थोडय़ाफार फरकाने देयकांबाबत हीच स्थिती असून याबाबत चौकशी करण्यास गेलेल्या ग्राहकांना महावितरण कंपनीचे अधिकारी आधी पैसे भरा नंतर बोला, अशी उत्तरे देऊन वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी याविरोधात एक मोर्चा काढण्यात आला.
नवी मुंबई परिसरातील वीज ग्राहक वीजदेयक भरण्याबाबत प्रामाणिक असून येथील थकबाकी नगण्य आहे. ऑक्टोबर हीट वाढल्यामुळे देयके वाढली असल्याचा हास्यास्पद युक्तिवाद महावितरण कंपनीचे अधिकारी करीत आहेत. एकाच इमारतीतील दोन रहिवाशांचा वीज वापर सर्वसाधारपणे सारखाच असताना त्यांच्या देयकांत काही हजारांची तफावत दिसत आहे. साठेनगरसारख्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या वीज ग्राहकाला चक्क २७ हजारांपासून ते ४५ हजार रुपयांची देयके दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात संतापाची लाट पसरली असून शुक्रवारी आमदार संदीप नाईक व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली या संतापाला वाट करून देण्यात आली.
ऐरोली सेक्टर १६ येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीने एका मोच्र्याचे आयोजन केले होते. यापूर्वी देयकावर मीटर रीडिंग घेऊन छायाचित्र प्रसिद्ध केले जात होते पण अलीकडे रीडिंग गायब होत आहे. कर्मचारी जुने छायाचित्र प्रसिद्ध करून अंदाजे देयक पाठवीत आहेत. काही ठिकाणी दोन महिने घर बंद असलेल्या ग्राहकालाही हजारोंचे देयक देण्यात आले आहे. मीटरमध्ये दोष असल्याने ही वाढीव देयके येत असून ती भरण्यात येऊ नयेत, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.

वाढीव देयकांबाबत चौकशी करण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महावितरण कंपनीचे अधिकारी दुरुत्तरे देत आहेत. अशा तक्रारी यापुढे सहन केल्या जाणार नाहीत. हा मोर्चा प्रातिनिधिक स्वरूपात आहे. महावितरणने आपल्या चुका वेळीच सुधाराव्यात. हे प्रकार कायम राहिल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
– संदीप नाईक, आमदार, ऐरोली

अनेक राहिवाशांकडे महागडी विद्युत उपकरणे आहेत. त्यानुसार विद्युत दर निश्चित करण्यात आलेले आहे. युनिटप्रमाणे देयके आकारणी होत असून चुकून दिलेले ४५ हजारांचे देयक कमी करून अडीच हजारांपर्यंत देण्यात आले आहे. मीटरच्या तपासणीनंतर नेमका दोष समजेल.
– एस. एस. महाजन, उपअभियंता, महावितरण