वाशीमध्ये इमारतीला तडे गेल्यानंतर महानगरपालिकेची रहिवाशांना सूचना
वाशी येथील ३० वर्षे जुन्या इमारतीला तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सेक्टर-३ मध्ये ही घटना घडली. ही इमारत अद्याप धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे इमारतीला तडे गेल्याने सिडकोनिर्मित सर्वच इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सरकारने सिडकोच्या धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय दिला आहे; मात्र सर्वच इमारती धोकादायक ठरू शकत नाहीत, या मुद्दय़ावर मुंबई उच्च न्यायालयाने सरसकट पुनर्विकासाला स्थगिती दिली आहे.
वाशी सेक्टर-३ मधील एक इमारतीला शनिवारी तडे गेले. विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही वरून मजबूत दिसणाऱ्या इमारतीला उभे तडे गेले आहेत. या घटनेनंतर रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास पालिकेने ७२ तासांची मुदत दिली आहे. या इमारतीला १६ रहिवाशांनी सिडकोच्या पूर्वीच्या बांधकामातील सज्जाऐवजी अतिक्ति बांधकाम करून एक जादा खोली बांधलेली आहे. त्यामुळे इमारतीला तडे गेल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सज्जाऐवजी एक जादा खोली बांधण्याची परवानगी सिडकोने शुल्क आकारून दिली आहे. अशा प्रकारे शहरातील तीन हजार सिडकोनिर्मित इमारतीत अतिरिक्त बांधकाम झालेले आहे.
सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण भागात आजवर एक लाख २७ हजार घरे बांधली आहेत. त्यात इमारतीचे संख्या चार हजापर्यंत आहे. यातील तीन हजार इमारती या ३० वर्षे जुन्या असल्याचे मानले जाते. या गृहनिर्माण संस्थांनी हे अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी घेतलेली आहे; पण त्याचे भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाला मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीदर्शन घडवावे लागत असल्याने अनेक सोसायटींनी हे भोगवटा प्रमाणपत्र घेता आले नसल्याचे समजते. सोसायटींनी अतिरिक्त केलेले हे बांधकाम मूळ बांधकामापेक्षा वेगळे असल्याने ते धोकादायक ठरत असल्याचे वाशी येथील घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने बांधलेल्या सर्व जुन्या इमारती व बैठी घरे धोकादायक ठरत आहेत.
वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी या सरसकट सिडकोनिर्मित इमारतींना वाढीव एफएसआय देण्यास एका जनहित याचिकेद्वारे हरकत घेतली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने वाढीव एफएसआय देण्यापूर्वी पाच जणांची एक शासकीय समिती स्थापन केली आहे. ती इमारत धोकादायक आहे की नाही समिती ठरवणार आहे. त्यानंतरच पालिकेने एफएसआय देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुन्या इमारतींचे धोकादायक ठरवणे धोक्यात आले आहे.
वाशी येथे कोपरी गावामागील सिडकोच्या अशा जुन्या इमारतींचे तेथील रहिशांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले, पण त्यांना वाढीव एफएसआय देण्यास पालिकेने अपात्र ठरविले आहे. त्यासाठी आयआयटीने केलेले या इमारतींची तपासणीही बासनात गुंडाळून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालिकेने जुन्या इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आवाहन केले आहे.

वाशीतील इमारतीला पडलेले तडे हे त्यांनी मूळ इमारतीत केलेल्या बांधकाम बदलामुळे केले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्यकता असून तसे आवाहन रहिवाशांना करीत आहोत.
अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका