प्रस्तावासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय; तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांकडून चौकशी सुरू  

गेली नऊ वर्षे पालिका सेवेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या ३६ अभियंत्यांच्या पदोन्नतीची टांगती तलवार गेली सहा महिने लटकत आहे. मात्र या पदोन्नतीसाठी काही पदाधिकारी व तथाकथित कामगार नेत्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा संशय प्रशासनाला असल्याने खुद्द पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीच या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने ही पदोन्नती रखडल्याची माहिती समोर येत आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अभियांत्रिकी, बांधकाम परवानगी, आरोग्य, पाणीपुरवठा, आरोग्य, नियोजन विभाग, आणि अनधिकृत बांधकाम विभागातील ३६ अभियंते २००९ पासून कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार पाच वर्षांनंतर या अभियंत्यांना शाखा अभियंता म्हणून पदोन्नती देण्याची तरतूद आहे. मात्र अद्याप ही पदोन्नती न मिळाल्याने अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदलीनंतर प्रशासनाने या अभियंत्यांना पदोन्नतीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र या संधीचे सोने करून काही पदाधिकारी व कामगार नेत्यांनी पदोन्नतीच्या नावाखाली अभियंत्याकडून लाखो रुपये वसूल केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. लक्ष्मीदर्शनाच्या या प्रकारात बांधकाम परवानगी व नियोजन विभागातील काही अभियंते आघाडीवर असल्याची चर्चा आहे. कारण या अभियंत्यांना चांगली वरकमाई मिळत असल्याने त्यांनी या पदोन्नतीच्या प्रकरणात त्यांनी रस घेतल्याचे समजते. त्याचबरोबर हा प्रस्ताव पटलावर घेण्यासाठीदेखील काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन घडविताना साठ लाख रुपये या अभियंत्याकडून जमा केल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.

दरम्यान  पालिकेतील साडेसहाशे नोकरभरतीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार काही अभियंत्याची भरती यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे शासनाची मंजुरी मिळूनही पदोन्नती मिळत नाही, अशी स्थिती त्यांची आहे.

प्रामाणिक अभियंत्यामध्ये अस्वस्थता

आयुक्त प्रत्येक प्रस्तावाचा बारकाईने अभ्यास करून चौकशीअंती निर्णय घेत आहेत. शिवाय अभियंत्याच्या पदोन्नतीसंबंधीच्या प्रस्तावाची तपासणी करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये काही पदाधिकारी व कामगार नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती आयुक्तांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे या प्रस्तावावरील निर्णय लांबणीवर पडला असून काही प्रामाणिक अभियंत्याचे मात्र यात नुकसान होत आहे. तर त्यापैकी काही पर्यायी नोकरीच्यादेखील शोधात आहेत.

नवी मुंबई पालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित असून या प्रकरणाची तपासणी सध्या सुरू आहे. या अभियंत्याची संख्या निश्चित सांगता येणार नाही.

किरणराज यादव, उपायुक्त, नवी मुंबई पालिका.