महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दोन वर्षांत गणवेशाचे पैसेच नाहीत

महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे पैसे जमा केल्याची शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने माध्यमिक शाळेतील एकाही विद्यार्थ्यांला अद्याप गणवेशाचे पैसे दिलेले नाहीत. चालू शैक्षणिक वर्षांचे तर नाहीच, मात्र गेल्या शैक्षणिक वर्षांचेही गणवेशाचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी लागणार आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

अन्य महापालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत मात्र पट वर्षांगणिक वाढत आहे; परंतु पालिका अधिकारी व महाराष्ट्र शासनाने गणवेशाचे व साहित्याचे पैसे खात्यात वर्ग न केल्यामुळे पालिकेतील विद्यार्थी जुन्या गणवेशातच शाळेत येतात. महापालिका शाळेत यंदा प्रवेश घेतलेले नवे विद्यार्थी तर घरच्या कपडय़ांमध्येच शाळेत येत आहेत. गेल्या वर्षी निविदा प्रक्रियेतील गणवेश व वस्तूंच्या किमतीतील घोळामुळे सुरुवातीची निविदा प्रक्रियाच रद्द करावी लागली होती. नवीन निविदा प्रक्रियेनंतरही विद्यार्थी गणवेश व सोयीसुविधांपासून वंचित राहिले.

गेल्या वर्षी पहिली ते आठवीच्या वर्गात म्हणजेच प्राथमिक विभागात ३१ हजार विद्यार्थी शिकत होते. माध्यमिक विभागात म्हणजेच नववी आणि दहावीचे पाच हजार विद्यार्थी होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, दप्तर, रेनकोट, बूट, सॉक्स, पीटी गणवेश, स्काऊट-गाईडचा गणवेशही मोफत दिला जातो. नववी व दहावीच्या मुलांना दोन गणवेश, बूट तसेच दोन सॉक्स, वह्य़ा-पुस्तके दिली जातात.

गेल्या वर्षी निविदा प्रक्रियेतील घोळांमुळे वर्षभर मुलांना गणवेश व साहित्य मिळालेच नाही. शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्याचे पैसे बँकेत विद्यार्थी व पालकांच्या एकत्रित खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यास सांगितले, परंतु ही सर्व प्रक्रिया राबवेपर्यंत मागील शैक्षणिक वर्ष संपून गेले. आता या शैक्षणिक वर्षांत पालिकेने प्राथमिक विभागातील १७ हजार ९६८ विद्यार्थ्यांचे पैसे आतापर्यंत वर्ग केले आहेत, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मागच्याच वर्षीचे पैसे मिळाले नाहीत, तर माध्यमिक विभागातील ५ हजार १०८ विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मागच्याच वर्षीचे पैसे वाटप अजून पूर्ण झालेले नाही.

पालिकेच्या कोणत्याही शाळेत गणवेशाचा नमुना नाही. गणवेशाचे कापड कुठे मिळते याची माहितीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे गणवेश घ्यायचा तरी कुठून, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.

शासन निर्णय व मागील वर्षीच्या निविदेतील त्रुटींमुळे गोंधळ झाला आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागांतील विद्यार्थी जुन्या गणवेशातच शाळेत येत आहेत. मागील वर्षीचे व या शैक्षणिक वर्षांचे पैसे लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात आधी पैसे जमा करा, तरच विद्यार्थी गणवेश घेतील, असे शिक्षण विभागाला सांगितले होते. संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर राबवायलाच हवी.

– सुधाकर सोनावणे, महापौर

पालिका शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी वर्षभर गणवेश दिले गेले नाहीत. मुलांनी जुन्या गणवेशातच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा केला. यंदाही तीच स्थिती आहे. स्वातंत्र्य दिन आला तरी गेल्या वर्षीचीच प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही. पालिकेने याबाबत ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे.

– किशोर पाटकर, शिवसेना नगरसेवक