नववी, दहावीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा नवी मुंबई पालिकेचा निर्णय

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाही आता माध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

शिक्षणविभागांतर्गत पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत शालेय पोषण आहार पुरवण्यात येतो. पण माध्यमिक शाळेतील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना शासन किंवा पालिकेमार्फत शालेय पोषण आहार पुरविण्यात येत नाही. या वाढीच्या वयात पोषक तत्त्वे मिळणे आवश्यक असल्यामुळे पोषण आहाराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याच्या ठरावाला सर्वसाधरण सभेत मान्यता देण्यात आल्यांनतर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता, त्याला मान्यता देण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला असता स्थायी समिती सदस्यांनी यामध्ये गौडबंगाल असल्याचे सांगत शिक्षण विभागाचे वाभाडे काढले. या वेळी नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बूट, दप्तर, गणवेश यामध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात येतात. मग शालेय पोषण आहार देण्याऐवजी त्याचे पैसे का जमा करण्यात येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे विद्यार्थी तो खात नाहीत, असा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. हा आहार जातो कुठे, शाळांमध्ये वाटण्यात येणारी राजगिऱ्याची चिक्की रेल्वेच्या डब्यात विकण्यात येत असल्याचा आरोप हांडे यांनी केला. राजगिरा चिक्की ही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेंगदाणा चिक्की द्यावी, अशी सूचना करण्यात आली. पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत. शाळांची पडझड झाली आहे, त्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळ्या प्रकाराचे जेवण देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केले. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते तर शासनाच्या अनुदानित शाळांनादेखील माध्यान्ह भोजन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जर विनाअनुदानित शाळांना भोजन देण्यात आले नाही, तर उपोषणाला बसण्याचा इशारा नामदेव भगत यांनी दिला.

पालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप सांगवे यांनी विद्यार्थ्यांना उसळ-खिचडी, भाजी-चपाती, असे रोज वेगवेगळे पदार्थ देण्यात येणार आहेत. हा आहार पोटभर मिळणार आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्यात येतो. आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय आल्यास ते पदार्थ आहार प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. तर वेळोवेळी  ठेकेदारालादेखील नोटीस देण्यात आली आहे. जिल्हापरिषदेशी पत्रव्यवहार केला आहे, असेही त्यांनी सांगितले. स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी चिक्कीचे अनेक घोटाळे शासनदरबारी उघड केले असून चिक्कीऐवजी दुसरे काही तरी विद्यार्थ्यांना द्यावे, अशी सूचना केली.

अन्नमित्र फाऊंडेशनकडे जबाबदारी

इस्कॉनद्वारा संचालित मे. अन्नमित्र फाऊंडेशन, मुंबई कडून कपूर रुग्णालयात माध्यान्ह भोजन पुरवले जाते. त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. त्यात उसळ, खिचडी, वरण-भात, भाजी-चपाती, सांबार-भात, पुलाव देण्यात येणार आहे. माध्यमिक शाळेतील ९ वी १० वीच्या ५ हजार ९९ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. १ ऑक्टोबर २०१७ पासून ही योजना लागू केली असून ३१ मार्च २०१७ पर्यंत विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येणार आहे. त्यासाठी ९८ लाख ५५ हजार ५५२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.