ठराव मंजूर करण्याचे भाजप वगळता सर्व पक्षांचे आदेश

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी १२ वाजता पालिका मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात अविश्वास ठराव मांडला जाईल. त्यासाठी पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या चार पक्षांनी पक्षादेश जारी केले आहेत. यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास ठराव मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत, तर भाजपने सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांविरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३६ (३) अन्वये मंगळवारी २५ ऑक्टोबरला अविश्वास ठराव मांडण्याची शिफारस स्थायी समितीतील १४ सदस्यांनी केली आहे. त्यानुसार पालिकेतील तीन प्रमुख पक्षांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे पक्षादेश जारी केले आहेत. त्यामुळे ठरावाच्या बाजूने १०५ मते पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेत एकूण १११ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे ५२, काँग्रेसचे १०, शिवसेनेचे ३९, भाजपचे सहा आणि अपक्ष चार असे संख्याबळ आहे. यात ठरावाच्या बाजूने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे व अपक्ष अशी  एकूण १०५ मते मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष अनंत सुतार यांनी केला आहे. यात भाजपचे सहा सदस्य तटस्थ राहणार आहेत. त्यांची रणनीती ठरविण्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे बैठक सुरू होती. दरम्यान काँग्रेसचे अखिल भारतीय कमिटीचे सदस्य माजी उपमहापौर अनिल कौशिक यांनी सोमवारी मुंढे यांची भेट घेऊन त्यांना सर्मथन दिले. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्येही ठरावावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

मोजकीच भाषणे

अनेक नगरसेवकांनी भाषणांची खास तयारी केली असली तरी मोजक्याच नगरसेवकांना भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा ठराव मतदानासाठी टाकला जाणार आहे. यावेळी ठरावाच्या बाजूने मतदान करणारे नगरसेवकही सत्ताधारी राष्ट्रवादीला चिमटे काढणार असल्याने या आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहातील वातावरण तंग होणार असल्याने मुख्यालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

कंत्राटी कामगार संपावर

सभागृहात आणि बाहेर वातावरण तंग असताना मंगळवारपासून साफसफाई, आरोग्य, मलेरिया, उद्यान, मलनि:सारण आणि पाणीपुरवठा विभागातील साडेसहा हजार कंत्राटी कामगार किमान वेतनासाठी बेमुदत संपावर जात आहेत. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी यातील अनेक कामगार मुख्यालयासमोर आमरण बेमुदत करणार असल्याचे समाज समता कामगार संघाचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी जाहीर केल्याने या वातावरणात ह्य़ा आंदोलनाची भर पडली आहे.ऐन दिवाळीत शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या ९१ कंत्राटदारांची कंत्राटे रद्द करण्याचा पालिकेने निर्णय घेतल्याने बहुतांशी प्रकल्पग्रस्त असलेले हे कंत्राटदार आणि त्यांचे साडेतीन हजार सफाई कामगार मंगळवारी पालिका मुख्यालयासमोर हजेरी लावणार आहेत. प्रकल्पग्रस्तांची घरे तोडणारा आयुक्त अशी प्रतिमा मुंढे यांची समाजमाध्यमांत तयार करण्यात आल्याने ठरावाच्या बाजूने मतदान न करणाऱ्या नगरसेवकांना पाहून घेतले जाईल, अशी धमकी देणारा एक संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त नगरसेवकांनी धसका घेतला आहे.

समाजमाध्यमांवर प्रचार

मुंढे यांच्या विरोधात काही राजकीय पक्षांनी वृत्तपत्रांमधून जाहीर भूमिका मांडल्यानंतर ‘मुंढे हटाव, नवी मुंबई बचाव’ असा प्रचार समाजमाध्यमांवर सुरू केला आहे. याला व्हॉट्स अ‍ॅपवर त्वेषाने ‘कमेंट’ दिल्या जात आहेत. यावर ‘अधिकारी हवा तर मुंढेंसारखाच’ अशा समर्थन देणाऱ्या प्रतिक्रियांनी समाजमाध्यमांवर मोठी जागा व्यापली आहे. ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर ग्रुप चालवणाऱ्या ‘अ‍ॅडमिन’ने मुंढे यांच्या आजवरच्या कार्याबद्दल वृत्तपत्रात, छापून आलेला मजकूर झळकवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या कामांची छायाचित्रे, ‘वॉक विथ कमिशनर’सारखा अनोखा उपक्रम यांचा समावेश आहे. या वेळी अनेकांनी आयुक्त म्हणून मुंढे हवेत की नकोत, असा सवाल विचारून मुंढेंसाठी पाठिंबा मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अधिकारीही बाहेर

पालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची एक बैठक संध्याकाळी वाशी येथे पार पडली. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचारी अधिकारी मंगळवारी पालिका मुख्यालयात न जाता नगरसेवकांना पाठिंबा देणार असल्याचे समजते.

शिंदे-म्हात्रे भेट

अविश्वास ठरावाला पाठिंबा न देण्याचा भाजप पक्षादेश आहे. त्यामुळे पालिकेतील हे सदस्य तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र वाशी व नेरुळ येथील दोन नगरसेवक पक्षादेश जुगारून ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बेलापूरच्या आमदार व भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांच्याशी चर्चा करून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

* मंगळवारी सकाळी अकरा वाजता सर्व पक्षाचे नगरसेवक पालिका मुख्यालयात येण्यास सुरुवात होईल. याचवेळी मुंढे समर्थक आणि विरोधकही पालिका मुख्यालयासमोरील मोकळ्या (रस्त्या पालीकडे) जागेत जमा होणार आहेत. ही एकूण संख्या पाच ते सहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यात घोषणाबाजी होणार असल्याने कायदा आणि  सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिका कामकाजात ऑनलाइन सेवा सुरू झाल्याने वेळेची बचत होते. कायदा आणि अधिकारांचा योग्य वापर करणारे आयुक्त तुकाराम मुंढे नवी मुंबईला मिळाले आहेत. ते पुढे हवे आहेत.

– अविनाश तिथे, कोपरखैरणे

आयुक्तांनी अतिक्रमणविरोधी कारवाई उल्लेखनीय आहे. नवी मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे झाल्यास मुंढेंसारखे आयुक्त हवेत. मुंढे योग्य पद्धतीने काम करीत आहेत.

-सुनील झावरे, नेरुळ

स्वार्थासाठी नवी मुंबईचा बळी देणाऱ्या राजकारण्यांना सामान्यांशी देणे-घेणे नाही आणि त्यांच्या दबावाला बळी न पडता सामान्यांशी एकरूप होणाऱ्या आयुक्तांची शहराला गरज आहे.

-अक्षय कदम, घणसोली

मुंढेसारखा शिस्तबद्ध, समस्यांची जाणीव असलेला आयुक्त नवी मुंबईला मिळाला आहे. 

-शिल्पा सुरगडे,  ऐरोली