पालिकेने लावलेल्या २० हजार रोपांची देखभाल वाऱ्यावर 

शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण करण्याची प्रथा सरकारी पातळीवर दरवर्षी पाळली जाते. १ जुलै २०१६ रोजी दोन कोटी रोपांची राज्यभरात लागवड करण्यात आली. त्यातील २० हजार झाडे नवी मुंबई महापालिकेने स्वत:च्या क्षेत्रातही लावली. रोपांच्या लागवडीची छायाचित्रेही मोठय़ा दिमाखात काढण्यात आली. वृत्तवाहिन्यांनी त्यांचे चित्रीकरण केले; मात्र रोपांच्या लागवडीनंतर त्यांच्या देखभालीची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे आले नसल्याचे स्पष्ट झाले. लागवड करण्यात आलेली काही रोपे सुकून मरून गेली आहेत, तर काही सुकलेल्या अवस्थेत कसा तरी तग धरून आहेत.

नवी मुंबई पालिकेने ‘एक व्यक्ती. एक झाड’ असा संकल्प सोडला होता. यानुसार शहरात एकाच दिवशी तब्बल दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली. महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांवर या रोपांची जतन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. या अभिनव उपक्रमात पालिकेच्या शाळांसह ४०० हून अधिक शाळांमध्ये चार हजार रोपांची लागवड करण्यात आली; परंतु लावलेल्या झाडांवर मात्र कोणतीही देखरेख नाही. झाडांना पाणी मिळते की नाही, त्याची देखभाल होते की नाही यावर यंत्रणेचे नियंत्रण नाही अथवा त्यांची जबाबदारीदेखील कोणावर नेमून देण्यात आलेली नाही. परिणामी, लावलेली झाडे नष्ट होऊन गेली आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ  शकला नाही.