नवी मुंबईत केवळ २७४ फटाका परवाने; जनजागृतीमुळे खरेदीही कमी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस परिमंडळ १ मध्ये तात्पुरत्या फटाका विक्रीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत फटाकाविक्री परवान्यांच्या संख्येत झालेली घट, गेले काही दिवस सुरू असलेला पाऊस आणि शाळा व समाजमाध्यमांतून होणारी जनजागृती यामुळे फटाक्यांना असलेली मागणी घटली आहे. गतवर्षी फटाकेविक्रीचे ४०० परवाने देण्यात आले होते, यंदा मात्र २७४ परवाने देण्यात आले आहेत. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यंदा नवी मुंबईतील कानठळ्यांत घट झाली आहे.

दिल्लीत फटाका विक्रीवर बंदी घातल्यानंतर नवी मुंबईतही फटाक्यांच्या विक्रीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आणि दिघा येथे फटाका विक्रीचे तात्पुरते स्टॉल दरवर्षीपेक्षा विलंबानेच लावण्यात आले. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला या दुकानांची संख्या सर्वात जास्त आहे, मात्र तेथील गर्दीत लक्षणीय घट झाली आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक फटाके विक्रेत्यांना परवानेच देण्यात आले नव्हते. शहरात केवळ २७४ विक्रेत्यांना तात्पुरता फटाका विक्री परवाना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र जास्त फटाका स्टॉल सुरू आहेत. तात्पुरत्या फटाका स्टॉलमध्ये अग्निशमन व्यवस्था, रेती व आग प्रतिबंधक व्यवस्था असणे आवश्यक असते. परंतु अनेक ठिकाणी ही व्यवस्था केलेली नाही.

फटाके आणि फराळ विक्रीच्या पदपथ आणि रस्त्यांवर लावलेल्या स्टॉल्समुळे दरवर्षी होणारी कोंडी विचारात घेऊन यंदा महापालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग, पोलीस तसेच वाहतूक विभागाने पदपथांवर फटाके विकण्यास बंदी घातली आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या दुकानांत आग लागल्यास मोठे नुकसान होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी मोकळ्या जागेतच असे स्टॉल्स लावण्याची सूचना पालिकेने केली होती, तरीही अनेक ठिकाणी पदपथावरच फटाके विक्री सुरू आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा केली असता वायू प्रदूषणाची आकडेवारी मिळालेली नाही. लक्ष्मीपूजनानंतर आकडेवारी हाती येईल, असे सांगण्यात आले.

नागरिकांनी दिवाळी उत्साहात साजरी करावी, पण आनंद साजरा करताना त्याचा फटका इतरांना बसणार नाही, जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे फटाके फोडताना योग्य काळजी घेण्यात यावी. फटाक्यांमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनी व वायुप्रदूषण होते. त्यामुळे फटाके विशेषत: कर्कश आवाजाचे फटाके फोडणे टाळावे.

डॉ. सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १ 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यंदा फक्त २७४ तात्पुरते फटाकाविक्री परवाने दिले आहेत. गेल्यावर्षी शहरात ४०० परवाने देण्यात आले होते. फटाक्याच्या दुकानांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. ग्राहकांचाही फारसा प्रतिसाद नसल्यामुळे यंदा नवी मुंबईत फटक्यांचा आवाज कमी आहे.

प्रभाकर गाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, नवी मुंबई महापालिका

शहरात शालेय विद्यार्थ्यांना फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली आहे. त्याचा परिणामी काही प्रमाणात फटाक्यांच्या मागणीवर झाला आहे. यंदा फटाका विक्री व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

दिनेश चव्हाण, तात्पुरता फटाका विक्रेते

शहरात सुरुवातीला फटाका खरेदी विक्रीबाबत संभ्रम होता. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फटाका खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शाळांमधूनही मुलांना आम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही शपथ देतो. त्यामुळे फटाके वाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे.मुलांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.

विजय पाटील, शिक्षक, नवी मुंबई रहिवासी