प्रदूषणाच्या शंकेने परिसरातील रहिवाशांत तर्कवितर्काना उधाण

कमळांचे तलाव, रोहित पक्ष्यांचे वसतिस्थान, आकाशनिरीक्षणाचे ठिकाण, छायाचित्रणासाठी उत्तम जागा, एखादी डुबकी घेण्याची संधी, जॉगिंगचे ठिकाण.. एनआरआय कॉम्प्लेक्समधील तलाव आणि त्याचा परिसर अशा अनेक कारणांमुळे रहिवाशांना प्रिय आहे. मात्र सध्या हा तलाव चर्चेत आहे तो गुलाबी पाण्यामुळे. हे पाणी गुलाबी का झाले असावे, याविषयी अनेक ‘सिद्धांत’ सध्या या परिसरात मांडले जात आहेत.

वाशी पट्टय़ातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला गळती लागल्यामुळे आणि ते सांडपाणी या तलावाच्या पाण्यात मिसळल्यामुळे हा रंगबदल झाला असावा, असे काही रहिवाशांचे म्हणणे आहे, तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी बिल्वदा काळे यांच्या मते, हा रंगबदल विशिष्ट प्रकाराचे शैवाल वाढल्यामुळे झाला असण्याची शक्यता आहे, मात्र आवश्यक चाचणी केल्यानंतरच त्यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल. नवी मुंबई महापालिकेला या गुलाबी छटेची कल्पना नसल्याचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सांगितले.

काहींच्या मते, दर वर्षी उन्हाळ्यात येथील पाण्याची पातळी कमी होते. याच सुमारास रोहित पक्ष्यांचे थवे येथे मोठय़ा संख्येने उतरतात, त्यांच्या विष्ठेमुळे हा रंगबदल झाला आहे. पाण्याचा रंग का बदलला आहे, याचा शोध महापालिकेने घेणे आवश्यक आहे.

तलावालगत इमारती आणि शाळा आहेत. तेथील रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.