मिळणार, मिळणार म्हणून शेतकरी ज्याची वाट पाहत होते तो सातबाराचा उतारा सोमवारपासून ऑनलाइन मिळणार आहे. यामुळे शेतकरी व त्यांच्या वारसांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार असून शेतकऱ्यांना घरबसल्या हा उतारा मिळू शकेल. सातबाराच्या एका उतारासाठी तलाठी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने शेतकरी व त्यांचे वारस त्रस्त झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यांचे सुरू असलेले संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना ही सुविधा मिळणार असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना अनेक कारणांसाठी लागणारा सातबाराचा उतारा मिळविण्यासाठी तलाठय़ाचा शोध घ्यावा लागत होता. आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला एका फेरीत सातबाराचा उतारा मिळालेला नाही. तसेच वर्षांनुवर्षांची कागदपत्रे घेऊन तलाठय़ांनाही फिरावे लागत होते. तलाठी कार्यालयातील लाल कळकट कापडात बांधलेल्या या कागदपत्रांना हात लावतानाही अंगावर काटा येत असे. मात्र राज्य सरकारने सातबाराचा उतारा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षांपूर्वी तलाठय़ांना लॅपटॉप खरेदीसाठी कर्जही दिले. त्यातून तलाठय़ांनी लॅपटॉप घेतले असून यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला थेट तलाठय़ाकडून लॅपटॉपवर आपल्या जमिनीचा सव्‍‌र्हे क्रमांक व गावाचे नाव सांगून सातबारा पाहता येईल. तसेच त्याची प्रतही घेता येईल. त्याचप्रमाणे इंटरनेटवरही हा सातबारा उतारा उपलब्ध असेल व त्यासाठी तलाठय़ाच्या सहीची गरजही भासणार नाही, अशी माहिती उरण तहसीलचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली.