विकासासाठीचा कोटी रुपयांचा निधी खर्चाविना

खारघर येथील पांडवकडा धबधबा केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे यंदाही पावसाळी पर्यटनासाठी खुला झालेला नाही.  सिडकोने वनविभागाला आणि वनविभागाने सार्वजनिक विभागाला या नैर्सगिक पर्यटन स्थळाच्या विकासासाठी दिलेले एक कोटी ३३ लाख रुपयांचा संपूर्ण खर्च अद्याप न झाल्याने हा धबधबा पर्यटकांसाठी अधिकृतरीत्या खुला होऊ शकणार नाहीे. या खर्चात संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा खर्च अंतर्भूत आहे. वनविभाग वा पोलिसांनी कितीही बंधने घातली तरी या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अतिउत्साही पर्यटक येत असल्याचे दिसून येते.

खारघर येथे पांडवकडा धबधब्याला महाविद्यालयात दांडी मारून मुले एका दिवसात भेट देतात. पावसाळ्यात पाण्याचा वेग वाढल्यानंतर या धबधब्यावर स्नानाचा आनंद घेणाऱ्या अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. यात मद्यपान करून धबधब्याखाली जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. लोणावळा, खंडाळा येथील टायगर पॉइंट, शहापूर येथील नैसर्गिक पर्यटनाच्या धर्तीवर ह्य़ा स्थळाचा विकास करावा असा वनविभागाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी या काळात या ठिकाणी काही उपाहारगृहांना परवानगी दिली जाणार असून पार्किंगच्या माध्यमातून महसूल जमा होणार आहे. ही कामे स्थानिक अदिवासींना दिली जाणार असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न काही काळाकरिता का होईना सुटणार आहे. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या या विभागाने गतवर्षी सिडकोकडे आर्थिक मदतीची याचना केली होती. सिडकोही आपल्या प्रसिद्धीतंत्रात या धबधब्याचा खुबीने वापर करीत असल्याने सिडकोने गतवर्षी एक कोटी ३३ लाख रुपये या स्थळाच्या विकासासाठी दिले होते. त्यानुसार या स्थळाला तारेचे कुंपण व धबाधब्याजवळ काही सुधारणा करण्यात आली आहे. सिडको जवळच्या गोल्फ कोर्ससाठी हा संपूर्ण परिसर गेली अनेक वर्षे वनविभागाकडे मागत आहे, पण ती जमीन न दिली गेल्याने सिडकोचा गोल्फ कोर्सही छोटा करावा लागला आहे. त्यामुळे सिडको या परिसराच्या विकासासाठी वनविभागाला निधी देत असून वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्व स्थापत्य यंत्रणा असल्याने हा निधी त्यांच्याकडे वर्ग केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील सावळ्या गोंधळामुळे यंदा देण्यात आलेला निधीतील अर्धा खर्च अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक असलेली संरक्षण भिंत उभारण्याचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदाही पर्यटकांसाठी पांडवकडा अधिकृतरीत्या चार हात लांब आहे. मात्र पोलीसांच्या गस्तीनंतरही काही अतिउत्साही पर्यटक पांडवकडय़ाच्या नैसर्गिक आविष्काराचा आनंद लुटत आहेत.

पांडवकडासारख्या नैसर्गिक स्थळाचे पावसाळी पर्यटन स्थळात परिवर्तन व्हावे यासाठी वनविभाग गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. त्यासाठी सिडकोकडून निधीदेखील मागण्यात आला आहे. मात्र सुरक्षेच्या सर्व उपाययोजना न झाल्याने यंदा पर्यटकांना पांडवकडय़ावर परवानगी देता येणार नाही. त्यासाठी लवकरच जागोजागी फलक लावून जनजागृती केली जाणार आहे.

शिवाजी ठाकरे, प्रादेशिक वन अधिकारी, पनवेल</strong>