हार-तुरे, फटाके, गुलाल आणि मिठाईशिवाय विजय साजरा होणे अशक्यच असल्यामुळे पनवेलमधील या सर्व वस्तूंचे विक्रेते निकालाच्या दिवसासाठी सज्ज झाले आहेत. विजयी उमेदवारांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी त्यांनी सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. जनतेने कोणाला कौल दिला आहे, हे अजून गुलदस्त्यात असल्यामुळे अद्याप कोणत्याही उमेदवाराने मिठाईची ऑर्डर दिलेली नाही. कळंबोली, खांदा कॉलनीतील दुकाने शुक्रवारी बंद असतात.त्यामुळे तेथील विजयी उमेदवारांना निकालानंतर मिठाईसाठी धावपळ करावी लागणार आहे. काही उमेदवारांना मिठाई खरीदेसाठी बेलापूर, नवी मुंबईत धाव घ्यावी लगण्याची चर्चा आहे.

सध्या शहरात मिठाईचे दर प्रति किलो ४०० ते ८०० रुपये आहे. गुलाल ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. १००० फटाक्यांची माळ ४०० ते ५०० रुपयांना तर ५००० फटाक्यांची माळ १२०० ते १५०० च्या घरात आहे. मोठे हार २५० पासून ७०० रुपयांपर्यंत आहेत. हार-जीत कोणाचीही झाली तरी उद्याचा दिवस या व्यापाऱ्यांसाठी मोठा ठरणार आहे.