माणशी १६० लिटर पाण्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटविण्याचे सर्वात मोठे आव्हान पनवेल महानगरपालिका प्रशासनासमोर राहणार आहे. यासाठीचे काटेकोर नियोजन आवश्यक असून सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या भविष्यातील पनवेलचे ‘जीवन’मान नव्या आयुक्तांना सुधारावे लागणार आहे.

प्रत्येक माणसी किमान १६० लिटर पाणी मिळणे गरजेचे आहे. पनवेल परिसरात गेल्या दोन वर्षांत पाण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात सुट्टी टाकून सिडको प्रशासनाविरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.  काहींनी तर पाण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. यामुळे दोन वर्षांपासून पनवेलचा पाणी प्रश्न तापला आहे. याच परिसराला मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या वाटेवर नेण्याचे स्वप्न दाखवले आहे. महानगरपालिकेद्वारे पाण्याचा गंभीर प्रश्न मिटविण्याचे ठरवले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २०११च्या सरकारी जनगणनेनुसार येथील लोकसंख्या पाच लाखांवर गेली आहे; मात्र भविष्यात हा आकडा सुमारे १५ लाखांपर्यंत गेल्याने प्रशासकांना या पाण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

भविष्यातील पाणीनियोजन

  • पाण्यासाठी अन्य प्रशासनांवर अवलंबून न राहता नवीन महानगरपालिकेने पनवेलनजीकचे जलस्रोत शोधून त्याद्वारे पाणीप्रश्नी स्वावलंबी होण्याची गरज आहे.
  • सध्या मोरबे धरणातून नवी मुंबई महानगरपालिकेकडून उसनवारी करून सिडको प्रशासन कामोठे आणि खारघर वसाहतींमधील नागरिकांची तहान भागवत आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) घेण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कळंबोली आणि नवीन पनवेलकरांची तहान भागत आहे.
  • सिडको प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी वसवलेल्या वसाहतीमधील नागरिकांसाठी बाळगंगा व कोंढाणे या धरणांसाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले. मात्र या धरणांमधील बांधकामांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे या धरणातून अद्याप पाणी सामान्यांना मिळू शकले नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला पनवेलनजीकचे जलस्रोत शोधून काढून त्यातून पाणी मिळवावे लागणार आहे.
  • पनवेल नगरपरिषदेच्या मालकीच्या देहरंग धरणातील गाळ काढणे, धरणाची उंची वाढवणे यासारखे पर्याय प्रशासकांना करावेच लागतील. याचसोबत टाटा पावर कंपनीचे वीज प्रकल्पातील रसायनी नदीवर जमा होणाऱ्या जलसाठय़ातून १५० दश लक्ष लिटर (एमएलडी) पाणी पनवेलपर्यंत आणण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम आणि हेटवणे धरणातील शिल्लक असणारे पाणी पनवेल महानगरपालिका क्षेत्राकडे आणण्यासाठी जलवाहिनीचे काम केल्यास पाण्याचा दुष्काळ संपेल.