मतदान वाढवण्यासाठी पनवेल महापालिकेचा उपक्रम

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा म्हणून पनवेल महापालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. मतदान केल्याचा सेल्फी पाठवा आणि मालमत्ता करात २५ टक्के सूट मिळवा, असा उपक्रम पालिका राबवणार आहे. प्रत्येक प्रभागातील मोजक्या मतदारांना ही सूट मिळणार आहे. पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक सुट्टीच्या काळात असल्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दवंडी पिटवणे, प्रभागात मोठे फलक लावणे, पथनाटय़, चित्ररथ, पोवाडा अशा पद्धतींचा वापर केला जातो. ७८ जागांसाठी २० प्रभागांतून सुमारे ४ लाखांपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. पहिल्यांदाच मतदराला आकर्षित करण्यासाठी अशी योजना अखण्यात आली असल्याचे पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर शाई लावलेल्या बोटासह सेल्फी किंवा संपूर्ण कुटुंबाचे छायाचित्र महापालिकेने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावे. त्यासोबत संपूर्ण नाव, प्रभाग क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांकही पाठवावा. त्यापैकी काही मतदारांना यंदाच्या मलमत्ताकरामध्ये २५ टक्के सूट देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातून पाच छायाचित्रे निवडली जातील. अशा प्रकारे २० प्रभागांतून एकूण १०० मतदारांच्या छायाचित्रांची निवड करून त्यांच्या २०१७-१८साठी मालमत्ता करात २५ टक्के सुट दिली जाणार आहे.

कुटुंबासहित पाठविण्यात आलेल्या छायाचित्राला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ७ या दरम्यान छायाचित्रे पाठवण्याची मुभा आहे. या स्पर्धेसाठी एक शिफारस समिती आहे. ही समिती सेफ्लींची छाननी करेल. निवडलेल्या मतदारांनी पुढील १५ दिवसांत मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास १५ टक्के सूट रद्द होईल.

विविध स्तरांवर जनजागृती

  • शहरात गॅस सिलिंडर, हॉटेल, दुकाने, रिक्षा, सोसायटय़ांच्या आवारात मतदार जनजागृतीसाठी पत्रके चिकटवण्यात येणार आहेत.
  • राज्य निवडणूक अयोगाने व महापालिकेने तयार केलेले जनजागृतिपर संदेश प्रभागनिहाय सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान रिक्षाद्वारे दवंडीतून देण्यात येणार आहेत.
  • पनवेल महापालिका हद्दीत दिवसातून ५ ते ६ वेळा ८ ते १० व्यक्तींचा गट पोवाडा गाऊन मतदानाचे आवाहन करणार आहेत. तसेच चित्ररथाच्या साहाय्यानेदेखील संदेश पोहोचविण्यात येणार आहे.

घरबसल्या शोधा मतदानकेंद्र

नाव व केंद्र शोधणे सोपे व्हावे यासाठी  महानगरपालिकेने pcmc voter searc अ‍ॅप तयार केले आहे. यावर मतदारांना त्यांचा वॉर्ड, प्रभाग, पत्ता, अनुक्रमांक मतदान केंद्र इत्यादी माहिती मिळू शकणार आहे. अ‍ॅपवर माहिती न मिळाल्यास १८००२२७७०१ या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधावा.