पनवेल पालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक २० हा शहरी भागासह दोन गावांना जोडणारा प्रभाग आहे. पण शहरीकरण आणि ग्रामीण भाग यांमधील विकासाची दरी या प्रभागाची मुख्य समस्या आहे. या प्रभागात महापालिका प्रशासनाने शहराप्रमाणेच गावांमधील ग्रामस्थांना २४ तास पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि दर्जेदार शिक्षण द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

काळुंद्रे गावाशेजारी सिडको प्रशासनाने भूखंड वितरित करून वसाहत बांधण्याची परवानगी दिल्यामुळे गावाशेजारील वसाहतीमध्ये मुबलक पाणी येते. पण गावकऱ्यांना मात्र सकाळ संध्याकाळ तासभर पाण्यासाठी वाट पहावी लागते. त्यामुळे भिंगारी व काळुंद्रे या गावामध्ये किमान पाणी पुरवठा तरी पालिका प्रशासनाने करावा, अशी मागणी या प्रभागातील नागरिकांची आहे. सद्य:स्थितीला भिंगारी गावात पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी येथील नागरिकांना अनेक वेळा पनवेल नगरपरिषदेच्या कार्यालयावर धडक मोर्चेदेखील काढले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुबलक पाण्याचा पुरवठा या परिसरात करावा, अशी प्रमुख मागणी या प्रभागातील महिलांची आहे.

त्याचबरोबर काळुंद्रे गावात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे गावात स्वच्छतागृह बांधावे, अशी अपेक्षा येथील महिलावर्गाची आहे. शिवाय काळुंद्रे गावात व गावाजवळील वसाहतीमध्ये एकही उद्यान नसल्याने ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचे विरंगुळाचे ठिकाण येथे उपलब्ध नाही. यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये उद्यानासाठीचे नियोजन प्रशासनाने करून नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उद्याण व खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करावे, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची आहे.

chart

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा गरजेची

मुंबई पूणे महामार्गावरून काळुंद्रे गावात जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने दुरुस्त करावेत, ही प्रमुख मागणी आहे. शिवाय येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र बदलांची गरज असून पनवेल रेल्वेस्थानक किंवा बस आगारातून थेट काळुंद्रे वसाहतीपर्यंत जाणारी बससेवा सुरू करावी. जेणेकरून तीन आसनी रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे. तसेच भिंगारी गावासमोर मुंबई-पुणे महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुल बांधावा, यासाठी देखील भिंगारचे ग्रामस्थ आग्रही आहेत.

प्रभाग क्षेत्र –

पनवेल शहराजवळील शासकीय विश्रामगृहाशेजारील तक्का गावाचा परिसरातील काही भाग, गाढी नदी ओलांडल्यानंतर काळुंद्रे व भिंगारी ही दोन गावे आणि ओएनजीसी कॉलनी